आय-बाईक फॉरेन्सिक पथक कार्यान्वित
भाईंदर : मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलिस आयुक्तालय हद्दीतील गंभीर गुन्ह्यांमध्ये घटनास्थळावरुन फॉरेन्सीक पुरावे गोळा करण्यासाठी आय-बाईक फॉरेन्सीक पथक स्थापन करण्यात आले असून या पथकाला पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांच्या हस्ते आय बाईक देण्यात आल्या.
नवीन कायदा अंमलबजावणीच्या अनुषंगाने ७ वर्ष आणि त्यापेक्षा जास्त शिक्षा असणाऱ्या गुन्ह्यांच्या घटनास्थळी फॉरेन्सीक व्हॅन पथकासह पोहचणे बंधनकारक करण्यात आले आहे. यानुसार घटनास्थळाचे बारकाईने निरीक्षण करुन शास्त्रोक्त पध्दतीने कौशल्यपूर्वक भौतिक पुरावे गोळा करणे आवश्यक असल्याने आय बाईक पथकाची स्थापना करण्यात आली आहे. त्यात फॉरेन्सीक पध्दतीने दुवे, पुरावे गोळा करण्याचे प्रशिक्षण घेतलेले पोलीस अंमलदारांची नेमणूक करण्यात आली आहे. त्याअनुषंगाने पोलीस आयुक्तालयामधील ३ परिमंडळासाठी फॉरेन्सीक किटसह प्रत्येकी एक आय-बाईक पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून कार्यान्वित करण्यात आल्या.
गंभीर गुन्ह्यांमध्ये घटनास्थळावरुन फॉरेन्सीक पुरावे गोळा करुन न्यायालयास शास्त्रोक्त पध्दतीने सादर करता येणार असल्याने गुन्ह्याचे दोषसिध्दीचे प्रमाण वाढण्यास मदत होईल.
-मधुकर पांडे, पोलीस आयुक्त-मीरा भाईंदर, वसई विरार पोलीस आयुक्तालय.