अंबरनाथ नाट्यमंदिराचे भाडे कमी करा

अंबरनाथ :  ‘अंबरनाथ नगरपरिषद'च्या मालकीच्या धर्मवीर आनंद दिघे नाट्यमंदिरातील असुविधा, तांत्रिक त्रुटी आणि अवाजवी भाडे दरामुळे स्थानिक कलाकार आणि आयोजकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर नगरसेवक निखिल चौधरी आणि विविध सांस्कृतिक संस्थांनी मुख्याधिकारी तसेच प्रशासनाला सविस्तर निवेदन सादर करुन तातडीने सुधारणा करण्याची मागणी केली आहे. विशेषतः व्यावसायिक नाटके आणि संगीत कार्यक्रमांसाठी वीज बिलासह सरसकट १७ हजार रुपये भाडे आकारण्यात यावे, असा प्रस्ताव त्यांनी मांडला आहे.

सध्या या नाट्यमंदिराची अवस्था बिकट असून ध्वनी व्यवस्था, लाईट सिस्टीममधील दोष आणि ऑपरेटरच्या अनुपलब्धतेमुळे कार्यक्रमांच्या सादरीकरणात मोठे अडथळे येत आहेत. स्टेजचा पडदा वेळेत न उघडणे, प्रेक्षकांना पूर्ण स्टेज न दिसणे आणि मध्यांतरावेळी होणारी गैरसोय यामुळे प्रेक्षक आणि कलाकारांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. अंबरनाथ मधील नाट्यमंदिराचे भाडे आणि वीज देयकाचे दर मुंबई, ठाणे आणि पुण्याच्या तुलनेत जास्त असल्याने स्थानिक संस्थांना कार्यक्रम करणे आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्याचे निखिल चौधरी यांनी निदर्शनास आणून दिले आहे.

या व्यतिरिक्त नाट्यमंदिरातील ‘बाल कोल्हटकर रंगमंच' नावाच्या नामकरणाबाबत असलेली अस्पष्टता दूर करुन तसे फलक लावण्याची मागणीही जोर धरत आहे. ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि महिलांसाठी रॅम्प, लिपट, सुरक्षा आणि पार्किंग अशा मूलभूत सुविधांचा अभाव येथे प्रकर्षाने जाणवत आहे. अंबरनाथ पूर्व भागात तिकीट विक्री केंद्र सुरु करावे आणि या वास्तुचे संवर्धन करुन तिचे रुपांतर एका दर्जेदार सांस्कृतिक केंद्रात करावे, यासाठी प्रशासनाने सकारात्मक पावले उचलण्याची गरज सदर निवेदनातून व्यक्त करण्यात आली आहे.

अंबरनाथच्या सांस्कृतिक चळवळीला बळ देण्यासाठी प्रशासनाने या मागण्यांचा गांभिर्याने विचार करावा, अशी अपेक्षा नगरसेवक निखिल चौधरी यांनी व्यक्त केली आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

‘स्वच्छ सर्वेक्षण'साठी ठामपा सज्ज