रायगड जिल्ह्यातील ३८५ रुग्णांना ३.३५ कोटींची मदत

अलिबाग : शासनाच्या आरोग्यविषयक विविध योजनांमधून मदत न मिळालेल्या पात्र आणि गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ‘आधार' ठरत आहे.  रायगड जिल्ह्यात आर्थिक वर्षात ३८५ रुग्णांना सुमारे ३ कोटी 3५ लाख रुपयांची वैद्यकीय आर्थिक मदत वितरित करण्यात आली आहे.
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून जिल्हा कक्षाची स्थापना, पेपरलेस अर्ज प्रक्रिया, तातडीने अर्जाचा निपटारा करणे आदी सकारात्मक बदल करण्यात आले. त्यासोबतच सामंजस्य करार, क्राउड फंडिंग आदींच्या माध्यमातून समाजातील मदत करणारी रुग्णालये, धर्मादाय रुग्णालये, संस्था, दाते आदींचे सहकार्य ‘मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी'ची वैद्यकीय आर्थिक मदत वितरित करण्यासाठी लाभत आहे.
मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या कार्यपध्दतीत केलेल्या सुधारणा आणि मदतीचे विविध मार्ग उपलब्ध करुन दिल्याने पारदर्शकता वाढून मदत वितरणाचा वेग लक्षणीयरित्या वाढला आहे. परिणामी, अधिकाधिक पात्र रुग्णांना वेळेत आर्थिक सहाय्य मिळत आहे.
 
२० गंभीर आजारासाठी मदत
कॉक्लियर इम्प्लांट (वय वर्ष २ ते ६), हृदय, यकृत, किडनी, फुपफुस, बोन मॅरो, हात आणि गुडघा प्रत्यारोपण, हिप रिप्लेसमेंट, कर्करोग शस्त्रक्रिया, रस्ते अपघात, लहान बालकांची शस्त्रक्रिया, मेंदूचे आजार, हृदयरोग, डायालिसिस, कर्करोग (केमोथेरपी/रेडिएशन), अस्थिबंधन, नवजात शिशुंचे आजार, बर्न (भाजलेले रुग्ण), विद्युत अपघात रुग्ण या एकूण २० गंभीर आजारांसाठी अर्थसहाय्य दिले जाते.
सामंजस्य करारातून मदतीचा मार्ग मोकळा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष, बीपीसीएल फा
उंडेशन आणि टाटा मेमोरियल सेंटर यांच्यात बालकांच्या कर्करोग उपचारासाठी नुकताच सामंजस्य करार करण्यात आला आहे. या करारामुळे सामाजिक दायित्व (सीएसआर) अंतर्गत उपचारांसाठी विशेष निधी उपलब्ध होणार आहे. आर्थिक अडचणी कमी होऊन गरजू बालकांना गुणवत्तापूर्ण कर्करोग उपचार सुलभ होणार आहेत.
आर्थिक वर्षातील मदत
१ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत राज्यातील तब्बल ४० हजार ७७६ रुग्णांना ३३३ कोटी ६ लाख ८१ हजार ५०० रुपयांची वैद्यकीय मदत देण्यात आली आहे. तर, याच कालावधीत रायगड जिल्ह्यातील ३८५ रुग्णांना सुमारे ३ कोटी ३५ लाख ३३ हजार रुपयांची आर्थिक मदत वितरित करण्यात आली आहे.
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून राज्यातील शेकडो गरजू रुग्णांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून उपचारासाठी भक्कम आधार मिळत आहे.  सुधारित कार्यपध्दती, तातडीने निर्णय आणि समाजाच्या सहभागामुळे मदतीचा लाभ अधिक वेगाने गरजूंपर्यंत पोहोचत आहे. अधिक माहितीसाठी आणि सहाय्यासाठी रुग्णांनी १८०० १२३ २२११ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांनी केले आहे.
Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

ग्रामपंचायत अधिकाऱ्याविरोधात ‘श्रमजीवी'चे उपहासात्मक आंदोलन