नमुंमपा शाळेतील अमोघ बनसोडे याची सातासमुद्रापार गुणवत्तापूर्ण झेप

नवी मुंबई; नवी मुंबई महापालिका शाळा क्र.१२० या शाळेचा इयत्ता दहावीतील विद्यार्थी अमोघ बनसोडे याची इंग्लड मध्ये डेव्हॉन येथे होणाऱ्या सीडस्‌ ऑफ पीस इंटरनॅशनल कॅम्प-२०२६ या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय कार्यक्रमासाठी निवड झाली आहे. या शिबिरामध्ये विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर नेतृत्व, संवादकौशल्य आणि शांतता प्रस्थापनेविषयी प्रशिक्षण दिले जाणार आहे.

अमोघ बनसोडे १८ जुलै ते ८ ऑगस्ट २०२६ या कालावधीत इंग्लंड येथे आयोजित आंतरराष्ट्रीय शिबिरात भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. अमोघचे यश नवी मुंबई महापालिकासाठी अभिमानास्पद असून, त्याच्या या यशामुळे इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळणार आहे. या कार्यक्रमासाठी देशातील १३ राज्यांमधून ३०० हून अधिक विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. कठोर निवड प्रक्रियेनंतर अंतिम १७ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली असून, त्यामध्ये अमोघ बनसोडे याने स्थान मिळविले आहे.

रबाले येथे रहात असलेल्या अमोघ बनसोडे याचे वडील ट्रक चालक असून त्याची आई गृहिणी आहे. त्याला दोन बहिणी असून, त्यापैकी एक इयत्ता बारावीमध्ये तर दुसरी द्वितीय वर्षात शिक्षण घ्ोत आहे. घरातील कोणीही उच्चशिक्षित नसतानाही अमोघ याने जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर सदर उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

या यशाबद्दल अमोघ याचे महापौर सुजाता पाटील, आयुक्त डॉ. कैलास शिंदे, अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांनी अभिनंदन केले असून त्याला शुभेच्छा प्रदान केल्या आहेत.

अमोघच्या या यशात नमुंमपा शाळा क्र.१२० च्या मुख्याध्यापिका गोमती श्रीनिवासन तसेच सहकारी शिक्षक यश पंत, नूरसबा शेख, रुथ अनूग्रह यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. अमोघच्या या यशामुळे नवी मुंबई महापालिका शाळांचा गौरव वाढला आहे. 

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश