पावणे एमआयडीसीत आगीत 8 कंपन्या जळुन खाक

सुदैवाने जीवीत हानी नाही,

नवी मुंबई  : पावणे एमआयडीसीतील बिटाकेम या केमिकल कंपनीत आग लागल्याने बिटाकेम कंपनीसह त्याच्या आजुबाजुच्या एकुण 8 कंपन्या जळून खाक झाल्याची घटना शनिवारी दुपारी सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास घडली. सुदैवाने या आगीत कुठल्याही प्रकारची जीवीत हानी झालेली नाही. अग्निशमन दलाच्या जवानांनी 5 तासाच्या अथक प्रयत्नानंतर येथील आग आटोक्यात आणली. त्यानंतर सायंकाळी कुलिंगचे काम सुरु होते. या आगीच्या भक्षस्थानी पडलेल्या आठही कंपन्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सदरची आग केमिकल टँकरमुळे लागल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.  

पावणे एमआयडीसीतील फ्लॉट.नं.डब्ल्यु-177 वर असलेल्या बिटाकेम कंपनीमध्ये दुपारी सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास आग लागली. त्यानंतर या कंपनीतून मोठ्या प्रमाणात काळ्या धुराचे लोट दूरवर पसरले. या कंपनीत कामाला असलेल्या कर्मचाऱयांनी वेळीच बाहेर पडल्याने ते बचावले. या आगीची माहिती मिळताच एमआयडीसी अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र कंपनीत मोठ्या प्रमाणात केमिकल असल्याने काही वेळातच सदरची आग आजुबाजुला पसरली. आगीची व्याफ्ती मोठी असल्याने वाशी, कोपरखैरणे व नेरुळ येथील महापालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. सदरची आग आजुबाजुच्या कंपन्यांमध्ये पसरल्याने त्या कंपनीतील कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यात आले.  

त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी पाच तासाच्या अथक प्रयत्नानंतर सायंकाळी 5 च्या सुमारास येथील आग आटोक्यात आणली. त्यानंतर सायंकाळी उशीरापर्यंत कुलींगचे काम सुरु करण्यात आले. या आगीमध्ये बिटकेम कंपनीच्या आजूबाजूला असलेल्या 7 कंपन्या देखील भक्षस्थानी पडल्या असून त्या कंपन्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सुदैवाने या आगीमध्ये कुठल्याही प्रकाराची जीवितहानी झालेली नाही. या आगीमागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी, बिटाकेम कंपनीमध्ये उभ्या असलेल्या केमिकलच्या टँकरला प्रथम आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर सदरची आग कंपनीमध्ये पसरल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. तुर्भे पोलीस ठाण्यात या आगीची नोंद करण्यात आली आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

लोकशाहीच्या बळकटीकरणात मतदारांचा सहभाग महत्त्वाचा -जिल्हाधिकारी जावळे