प्रतिक्षा संपली! गव्हाण फाटा रेल्वे क्रॉसिंग पुल वाहतुकीसाठी खुला
उल्हासनगरातील गुंडगिरी ठेचून काढणार -मुख्यमंत्री
उल्हासनगर : उल्हासनगर विकासाची भूमी आहे, गुन्हेगारांची नाही. इथे कोणाचीही समांतर सत्ता चालू दिली जाणार नाही, फक्त कायद्याचेच राज्य चालेल. गुंडगिरी कशी मोडून काढायची ते या ‘देवाभाऊ'ला चांगलेच ठाऊक आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहरातील गुन्हेगारी प्रवृत्तींना जाहीर सभेत ललकारले.
आगामी महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा शंखनाद करताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी शहराच्या सुरक्षिततेची जबाबदारी स्वीकारत, विकासासाठी कोट्यवधींच्या निधीचा वर्षाव केला. सेंच्युरी मैदानात झालेल्या या सभेने उल्हासनगरच्या राजकीय वातावरणात मोठी खळबळ उडवून दिली आहे. यावेळी त्यांच्यासोबत व्यासपीठावर भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, आमदार कुमार आयलानी, सुलभा गायकवाड, जिल्हाध्यक्ष राजेश वधारिया, धनंजय बोडारे यांच्यासह ‘महायुती'चे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या भाषणात नाव न घेता स्थानिक विरोधकांवर थेट हल्ला चढवला. काही काळ शहराच्या विकासाला खिळ बसली होती. पण, आता विकासाचे इंजिन सुसाट धावेल असे सांगत त्यांनी कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्याचा निर्धार व्यक्त केला.
शहराच्या कायापालटासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी आकड्यांसह विकासाची ब्ल्यू-प्रिंट मांडली. यामध्ये नागरिकांच्या आरोग्यासाठी आणि विरंगुळ्यासाठी उद्यानांना ८८ कोटी, तरुणांसाठी भव्य स्पोर्टस् कॉम्प्लेक्सला २४ कोटी, तर सार्वजनिक वाहतूक सक्षम करण्यासाठी टीएमटी बससेवेला १८ कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय सिंधी समाजाच्या अस्मितेचे प्रतिक असलेल्या सिंधी भवनासाठी ३.६१ कोटी आणि महापालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीसह इतर वास्तुंसाठी ८० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
दरम्यान, महापालिका निवडणूक केवळ नगरसेवक निवडण्यासाठी नाही, तर उल्हासनगरचे भवितव्य ठरवण्यासाठी आहे, असे आवाहन करत मुख्यमंत्र्यांनी जनतेला विकासाच्या बाजुने कौल देण्याची विनंती केली. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत सुरक्षिततेचा मुद्दा केंद्रस्थानी राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.