सूर्या पाणी पुरवठा योजनेच्या कामांची महापौर, आयुक्तांकडून पाहणी
वीटभट्टी व्यावसायिकांवर अवकाळीचे सावट
भिवंडी : हवामान विभागाने पुढील काही दिवस वर्तवलेल्या अवकाळी पावसाच्या इशाऱ्यानंतर राज्यात अनेक ठिकाणी २३ एप्रिल रोजी रात्री पावसाने हजेरी लावली.याच पार्श्वभूमीवर भिवंडी तालुक्यात मुख्यतः ग्रामीण भागात रात्री ढंगाच्या गडगडाटासह विजांच्या कडकडाटात तुरळक ठिकाणी पावसाच्या रिपरिपीने हजेरी लावली. त्यामुळे एकीकडे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला असला तरी दुसऱ्या ठिकाणी मात्र वीटभट्टी व्यावसायिक मालकांवर अवकाळी पावसाच्या काळे ढगांचे सावट निर्माण झाले आहे. वीटभट्टी व्यावसायिकांना आर्थिक फटका बसण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
तालुक्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात शेतीला पूरक जोडधंदा म्हणून वीटभट्टी व्यवसाय केला जात आहे. दरम्यान, वीटभट्टी व्यवसायाचा आर्थिक फायद्याचे एप्रिल आणि मे असे दोन महिने शिल्लक असतानाच अचानकपणे २३ एप्रिल रोजी रात्री पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे विटांचा कच्चा माल पाण्यात भिजून व्यावसायिकांना नुकसानीला सामोरे जावे लागण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. व्यावसायिकांनी कच्च्या मालाच्या तयार विटांच्या वीटभट्टीवर ताडपत्री टाकून वीटभट्टीला संरक्षण देण्याचा प्रयत्न केल्याचे भिवंडी तालुक्यातील ग्रामीणमध्ये सुरु असलेल्या अनेक ठिकाणच्या वीटभट्टी व्यवसायातून दिसून येत आहे.
त्यातच हवामान विभागाने अनेक जिल्ह्यांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर काही ठिकाणी उष्णतेच्या लाटांची शक्यता वर्तवली आहे. त्यानुषंगाने महाराष्ट्रासह मुंबई, ठाणे जिल्ह्याला उष्णतेच्या लाटांचा इशारा देण्यात आला असला तरी तापमानात अचानकपणे बदल होऊन पावसाचाही अंदाज वर्तवण्यात आला आहे. याकरिता व्यावसायिकांनी सावधता बाळगत विटांचा कच्चा माल पाण्यात भिजून नुकसान होऊ नये म्हणून ताडपत्री टाकून कच्चा माल झाकण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे ऐन आर्थिक नपयाच्या मुख्य महिन्यात येथील वीटभट्टी व्यावसायिक नुकसानीच्या चिंतेत सापडल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे भिवंडी ग्रामीणमध्ये टेंभवली, जूनादुर्खी, लाखिवली, पालिवली,धामणे, चिंबिपाडा, पाये, पायगाव, खारबाव, मालोडी, खार्डी, कोनगाव, पिंपळास, सुपेगाव,अंबाडी आदि गावांमध्ये सुमारे २५० पेक्षा जास्त वीटभट्ट्या असून या वीटभट्ट्यांवर सुमारे १० हजार पेक्षा जास्त कुटुंबे अवलंबून आहेत.