प्रतिक्षा संपली! गव्हाण फाटा रेल्वे क्रॉसिंग पुल वाहतुकीसाठी खुला
महाराष्ट्रातील सौर कृषी क्रांतीचा दिल्लीत गौरव
मुंबई : शेतीसाठी वीजपुरवठा करणाऱ्या कृषी वीजवाहिन्यांच्या सौर ऊर्जीकरणात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल ‘महावितरण'चा ‘ऑल इंडिया डिस्कॉम्स असोसिएशन'च्या (एआयडीए) ‘एडिकॉन-२०२६' या राष्ट्रीय परिषदमध्ये पुरस्काराने गौरव करण्यात आला. केंद्रीय ऊर्जामंत्री ना. मनोहर लाल यांच्या हस्ते ‘महावितरण'चे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांना सदर पुरस्कार प्रदान करण्यात आला.
केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली देशातील वीज वितरण क्षेत्रातील विविध संस्थांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ‘ऑल इंडिया डिस्कॉम्स असोसिएशन'च्या ‘एडिकॉन-२०२६' राष्ट्रीय परिषदेचे नवी दिल्ली येथे २१ आणि २२ जानेवारी रोजी आयोजन करण्यात आले. या ‘परिषद'चे उद्घाटन केंद्रीय ऊर्जामंत्री मनोहर लाल यांच्या हस्ते झाले. यावेळी व्यासपीठावर केंद्रीय ऊर्जा सचिव पंकज अग्रवाल, ‘महावितरण'चे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक आणि ‘ऑल इंडिया डिस्कॉम्स असोसिएशन'चे अध्यक्ष लोकेश चंद्र, सरचिटणीस डॉ. आशिष कुमार गोयल, महासंचालक आलोक कुमार यांची उपस्थिती होती. या ‘परिषद'मध्ये देशभरातील वीज वितरण कंपन्यांचे पदाधिकारी आणि ऊर्जा क्षेत्रातील तज्ञ प्रतिनिधी उपस्थित होते.
आशियातील सर्वांत मोठा विक्रेंद्रीत सौर ऊर्जा प्रकल्प असलेल्या मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजना २.० चा ‘एडिकॉन' परिषदेत गौरव करण्यात आला. या योजनेत आतापर्यंत १९८५ कृषीवाहिन्यांचे सौर ऊर्जीकरण करण्यात आले असून राज्यातील तब्बल ८ लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा वीजपुरवठा उपलब्ध झाला आहे. सदर योजनेमुळे ६५ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह ७० हजारांवर ग्रामीण रोजगार निर्मिती सुरु आहे. तसेच ‘महावितरण'च्या वीज खरेदीमध्ये १० हजार कोटींच्या वार्षिक बचतीसोबतच क्रॉस सबसिडीमध्ये १३,५०० कोटींनी वार्षिक बोजा कमी होणार आहे. तब्बल २३१ विकासकांकडून या योजनेमध्ये १६ हजार मेगावॅटचे विकेंद्रित सौरऊर्जा प्रकल्प वेगाने उभारण्यात येत आहेत.
शेतकऱ्यांना प्रामुख्याने दिवसा आणि शाश्वत वीजपुरवठा करणे, वीज खरेदीचा आणि पर्यायाने अनुदानाचा बोजा कमी करणे, औद्योगिक-व्यावसायिक वीजदर कमी करणे यासाठी मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजना २.० अत्यंत उपयुक्त ठरत आहे.