नवी मुंबईत ‘महालक्ष्मी सरस'चा डंका

नवी मुंबई : मुंबई आणि नवी मुंबईकरांसाठी आनंदाची पर्वणी घेऊन ‘महालक्ष्मी सरस' प्रदर्शनाचे भव्य उद्‌घाटन वाशी येथील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये २४ मार्च रोजी दिमाखात पार पडले. महिला शक्तीच्या उत्साहात या प्रदर्शनाचे द्वार सर्वांसाठी खुले झाले आहे. महालक्ष्मी सरस प्रदर्शन ३ एप्रिलपर्यंत सुरु राहणार आहे.

उदघाटन सोहळ्याला ‘अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ'चे अध्यक्ष नरेंद्र पाटील, ‘नवी मुंबई'च्या महापौर सुजाता सुरज पाटील, ‘महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान-उमेद'चे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश सागर, ग्रामविकास कार्यालयाचे विशेष कार्य अधिकारी दादासाहेब कांबळे, नारायण गोरे, अवर सचिव धनवंत माळी, मुख्य परिचालन अधिकारी निखिलकुमार ओसवाल, नमुंमपा महिला-बालकल्याण समिती सभापती सलुजा सुतार, नगरसेविका रेश्मा मढवी, आदि उपस्थित होते.

यावेळी महापौर सुजाता सुरज पाटील म्हणाल्या की, पूर्वी पुरुषप्रधान संस्कृतीची चर्चा होत असे; पण आज महिला प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर आहेत. मुंबई आणि नवी मुंबईकरांच्या दारी सदर मोठी संधी चालून आली आहे. महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळवून देणे आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करणे, असा या प्रदर्शनाचा मुख्य उद्देश आहे. नवी मुंबई महापालिका सर्वतोपरी मदत करील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

‘अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ'चे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी आपल्या भाषणात महिलांच्या प्रगतीचा गौरव केला. ‘महामंडळ'च्या माध्यमातून महिलांना जास्तीत जास्त आर्थिक पाठबळ देण्यासाठी महामंडळ सक्षम आहे. ‘महालक्ष्मी सरस'ला मिळणारा प्रतिसाद उत्स्फुर्त असून उलाढाल सातत्याने वाढत आहे. राज्यातील सर्व महामंडळे एकत्र करुन कर्ज वाटपाची संकल्पना आम्ही राबवण्याचा विचार करीत आहोत. ज्यामुळे महिलांचा सहभाग आणि उत्साह अधिक वाढेल.

‘उमेद'चे सीईओ नीलेश सागर म्हणाले, ‘महालक्ष्मी सरस'ने महिलांच्या पंखात बळ दिले आहे. आता आमचे उद्दिष्ट राज्यातील १ कोटी महिलांना ‘लखपती दीदी' करण्याचे आहे. ४२०० हून अधिक उत्पादने आता ऑनलाईन व्यासपीठावर उपलब्ध असून आंतरराष्ट्रीय स्तरावर मार्केटिंग आणि पॅकेजिंगमध्ये मोठी सुधारणा झाली आहे.

‘महालक्ष्मी सरस' प्रदर्शनात एवूÀण स्टॉल्स ४९० असून त्यात ४२० स्टार्ट-अप क्रांती-बचत गटांची उत्पादने असलेली ४२० स्टॉल्स आणि खाद्यपदार्थांची ७० स्टॉल्स आहेत.

सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समीरा गुजर यांनी केले. आभार प्रदर्शन ‘उमेद'चे मुख्य परिचलन अधिकारी निखीलकुमार ओसवाल यांनी केले. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

‘नमुंमपा'ची थकबाकीदारांविरोधात धडक कारवाई