प्रतिक्षा संपली! गव्हाण फाटा रेल्वे क्रॉसिंग पुल वाहतुकीसाठी खुला
‘अंबरनाथ नगरपरिषद'च्या शाळा क्र.९ च्या नवीन वास्तुचे लोकार्पण
अंबरनाथ : अंबरनाथ पूर्व शिवगंगानगर परिसरातील ‘नगरपरिषद'च्या सुसज्ज आणि आधुनिक डिजिटल मराठी शाळा क्रमांक-९ (सेमी इंग्लिश) या शाळेने आपल्या नवीन वास्तुमध्ये १९ जानेवारी रोजी उत्साहात प्रवेश केला. गेली अनेक वर्षे प्राचीन शिवमंदिर परिसरातीलमोडकळीस आलेल्या आणि जर्जर इमारतीत बिकट परिस्थितीमध्ये शिक्षण घेणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांसाठी सदर नवीन इमारत एक मोठा आधार ठरली आहे. सुमारे ९ कोटी रुपयांच्या निधीतून साकारलेली शाळेची तीनमजली वास्तू अद्ययावत शैक्षणिक सुविधांनी सज्ज असून, यामुळे ‘नगरपरिषद'च्या शाळांमध्ये आता डिजिटल शिक्षणाचे वारे वाहू लागले आहेत.
विद्यार्थ्यांना आधुनिक काळाशी सुसंगत शिक्षण मिळावे या उद्देशाने या शाळेत संगणक कक्ष, सुसज्ज प्रयोगशाळा, वाचनालय आणि डिजिटल बोर्डसह प्रशस्त वर्गखोल्यांची निर्मिती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली अजय जाधव आणि माजी नगरसेवक रवी पाटील यांच्या विशेष पाठपुराव्यातून सदर प्रकल्प पूर्णत्वास आला आहे. पहिल्याच दिवशी सरस्वती पुजनाने शाळेची सुरुवात झाली असून, शिशूमंदिर ते इयत्ता आठवीपर्यंतच्या सुमारे ३०० विद्यार्थ्यांमध्ये या नव्या सुसज्ज वर्गांविषयी कमालीचा उत्साह दिसून आला. भिंतींवरील आकर्षक चित्रे आणि आधुनिक आसन व्यवस्था यामुळे सदर शाळा खासगी शाळांच्या तोडीची ठरत असून, मुख्याध्यापक श्रीराम जोशी यांनी शाळेची गुणवत्ता आणि पटसंख्या वाढवण्याचा मानस व्यक्त केला आहे.
नवीन इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी विविध मान्यवरांनी हजेरी लावली होती. तरीही काही मूलभूत सुविधांच्या अभावाचा प्रश्न अद्याप प्रलंबित आहे. शाळेच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले असले, तरी ‘महापालिका'कडून अद्याप पाणीपुरवठा मिळालेला नाही. तसेच सुरक्षारक्षक आणि आरोग्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे अद्याप बाकी आहे.
या संदर्भात मुख्याध्यापकांनी महापालिकेला लेखी निवेदन दिले असून, प्रशासनाकडून येत्या २ दिवसात पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याचे आश्वासन दिले आहे. सध्या शाळेत रंगकाम आणि डिजिटल सुविधांचे अंतिम काम युध्दपातळीवर सुरु असून, लवकरच विद्यार्थ्यांसाठी विविध पुस्तकांचे भांडार असलेले समृध्द ग्रंथालय खुले होणार असल्याची माहिती महापालिका अधिकारी राजेश तडवी यांनी दिली आहे.