‘एमसीएचआय प्रॉपर्टी प्रदर्शन'ला उपमुख्यमंत्र्यांची भेट

कल्याण : कल्याण-डोंबिवली परिसरातील वाढती वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुराव्यातून मेट्रो, रिंगरोड, डबल डेकर रस्ते, नवीन कनेक्टिव्हिटी मार्ग यासारखे महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येत आहेत. यामुळे भविष्यात कल्याण-डोंबिवली मधील वाहतूक कोंडीचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटेल, असा विश्वास राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

कल्याण येथे आयोजित ‘एमसीएचआय प्रॉपर्टी प्रदर्शन'मध्ये उपमुख्यमंत्री बोलत होते. याप्रसंगी ‘केडीएमसी'च्या महापौर हर्षाली चौधरी, महापालिका आयुक्त अभिनव गोयल, शिवसेना शहरप्रमुख रवी पाटील, थारवानी इन्फ्रास्ट्रक्चरचे एमडी मोहन थारवानी आणि ‘एमसीएचआय'चे पदाधिकारी, आदि उपस्थित होते. यावेळी थारवानी समूहाच्या वतीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वागत करण्यात आले.  

ना. एकनाथ शिंदे यांनी यावेळी विकासकांना शासनासोबत समन्वयाने काम करण्याचे आवाहन केले. तुमचे सर्व प्रश्न सोडवू; मात्र घरांच्या किंमती सर्वसामान्यांच्या आवाक्यात ठेवा, असेही त्यांनी स्पष्ट केले. मेट्रो-५ प्रकल्पाचे टेंडर लवकरच निघणार असून शिळफाटा रस्ता ३ पदरी करण्यात येणार आहे. तसेच रांजणोली मार्गाचेही रुंदीकरण सुरु आहे. कल्याण-डोंबिवलीतील वाहतूक बाहेर वळवण्यासाठी रिंगरोड प्रकल्पासाठी भूसंपादन जलदगतीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

याशिवाय जेएनपीटी-वडोदरा महामार्गाला कल्याणजवळ कनेक्टिव्हिटी देण्याची विनंती कल्याण-डोंबिवली मधील बांधकाम व्यावसायिकांनी केली आहे. तिचा धागा पकडत आपण संबंधितांना त्याबाबत कल्याणला अप्रोच देण्याबाबत नक्कीच सूचना करु, असे आश्वासन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिले. ठाणे-पडघा ८ लेन मार्ग, डबल डेकर रस्ते अशा प्रकल्पांमुळे मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक सुरळीत होईल, असे त्यांनी सांगितले. ज्यामुळे या मार्गावरील वाहतूक कोंडी पूर्णपणे सुटून जाईल, असे ते म्हणाले.

पाणीपुरवठ्याबाबत बोलताना ना. शिंदे यांनी नवीन काळू धरणाचे काम युध्दपातळीवर सुरू असून वाढत्या लोकसंख्येची गरज लक्षात घेऊन भविष्यातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी शासन कटिबध्द असल्याचे नमूद केले. विकासकांनी शहरातील रस्ते, सुविधा, सार्वजनिक कामांमध्ये सहभाग घ्यावा, असे आवाहन करताना महापालिका आणि शासन आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देईल, असे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. तसेच कल्याण स्टेशन सॅटीस प्रकल्प लवकर पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांना यावेळी दिल्या.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

ठाणेतील ‘प्रॉपर्टी प्रदर्शन'मध्ये २३४ घरांची नोंदणी