१२ व्या राज्यस्तरीय ‘अटल करंडक' एकांकिका स्पर्धेच्या महाअंतिम फेरीला सुरुवात
पनवेल : श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत तसेच अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा आणि चांगू काना ठाकूर महाविद्यालय (सीकेटी) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या १२ व्या राज्यस्तरीय ‘अटल करंडक' एकांकिका स्पर्धेच्या अंतिम फेरी सोहळ्याचे उद्घाटन पनवेलमधील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात सुप्रसिध्द अभिनेते गिरीश ओक, दिग्दर्शिका प्रतिमा कुलकर्णी, अभिनेते सुनील तावडे यांच्या हस्ते ५ डिसेंबर रोजी संपन्न झाले. तीन दिवस चालणाऱ्या या महाअंतिम फेरीत राज्यभरातून १०० हुन अधिक एकांकिकांमधून निवड झालेल्या उत्कृष्ट २५ एकांकिका सादर होणार आहेत. या माध्यमातून नाट्य रसिकांना मोठी मेजवानी मिळाली असून विशेष म्हणजे या सोहळ्याला युवा ते ज्येष्ठ नाट्य रसिकांची मोठी गर्दी पहायला मिळाली.
१२ व्या पर्वाच्या या सोहळ्याच्या प्रारंभाला अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा उपाध्यक्ष तथा स्पर्धा प्रमुख आणि पनवेल महापालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर, ‘भाजपा'चे उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, माजी शहर अध्यक्ष जयंत पगडे, माजी नगरसेवक अनिल भगत, अजय बहिरा, राजू सोनी, ‘महिला मोर्चा'च्या शहर अध्यक्षा रुचिता लोंढे, माजी नगरसेविका दर्शना भोईर, सुरेखा मोहोकर, प्रीती जॉर्ज, सुरेखा कल्याणकर, नलिनी शेलार, सिध्दीका पुंजानी, ‘युवा मोर्चा'चे जिल्हाध्यक्ष आनंद ढवळे, अभिनेता भरत सावले, अभिनेते तथा दिग्दर्शक राजा अत्रे, ‘सीकेटी कॉलेज'चे प्राचार्य डॉ. एस. के. पाटील, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे संचालक संजय भगत, अमित ओझे, प्रीतम म्हात्रे, रुपेश नागवेकर, मयुरेश नेतकर, संजय जैन, पवन सोनी, हिमेश बहिरा, आरती तायडे, मनिषा बहिरा तसेच श्यामनाथ पुंडे, सांस्कृतिक सेलचे जिल्हाध्यक्ष अभिषेक पटवर्धन, चिन्मय समेळ, अमोल खेर, गणेश जगताप, वैभव बुवा, आदि उपस्थित होते.
महाअंतिम फेरीच्या पहिल्या दिवशी वसंतराव नाईक विज्ञान संस्था नागपूरची एकांकिका ‘वि. प्र', मुलुंड वाणिज्य विद्यालय ‘स्वातंत्र्य सौभाग्य', मिथक मुंबईची ‘कारण काय', एकदम कडक नाट्य संस्था भाईंदरची ‘बकेट लिस्ट', वि. ग. वझे विद्यालय मुलुंडची ‘द गर्दभ', आर्टस कॉमर्स अँन्ड सायन्स कॉलेज साताराचे ‘सोयरीक', नाट्य स्पर्श आणि भवन्स महाविद्यालय अंधेरीची ‘प्रतिक्षायान', राजाराम बापू अभियांत्रिकी महाविद्यालय इस्लामपूरची ‘हाफ वे', कलादर्पण पनवेलची ‘आख्यान-ए-झुरळ' आणि रेवन एंटरटेनमेंट पुणेची ‘सांग रहियो' या १० एकांकिकांचे सादरीकरण होते. उर्वरित १५ एकांकिका ६ आणि ७ डिसेंबर रोजी सादर होणार आहेत. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ ७ डिसेंबर रोजी होणार असून स्पर्धेतील विजेत्या एकांकिकेला १ लाख रुपये आणि मानाचा ‘अटल करंडक' देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच ज्येष्ठ रंगकर्मी नीना कुलकर्णी आणि सुप्रसिध्द अभिनेते तथा निर्माता सुनिल बर्वे यांचा ‘गौरव रंगभूमीचा' पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे.