आयटीआय मध्ये नवीन ६ अभ्यासक्रम
ठाणे : ‘आयटीआय' मध्ये येत्या २०२५-२६ या शैक्षणिक वर्षापासून नवीन सहा अभ्यासक्रम सुरु करण्यात येणार आहेत. यात कृत्रिम बुध्दीमत्ता, ईव्ही इलेक्ट्रिक वाहन व्यवस्थापन, इंडस्ट्रिअल रोबोटिक्स आणि थ्री डी प्रिंटिंग, ड्रोन तंत्रज्ञान, सोलर टेक्निशियन या अभ्यासक्रमांचा समावेश आहे, अशी माहिती राज्याचे कौशल्य विकास मंत्री ना. मंगलप्रभात लोढा यांनी दिली.
जम्मू आणि काश्मीर येथील पहलगाम इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान सीमेवर सध्या तणावाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर कौशल्य विभाग आणि अनिरुध्दाज ॲकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे देण्यात येत आहेत. राज्याचे कौशल्य विकास मंत्री ना. मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते ठाणे येथील राजमाता जिजाऊ औद्योगिक प्रशिक्षण संस्था मध्ये ८ मे रोजी या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमात ना. मंगलप्रभात लोंढा बोलत होते.
याप्रसंगी ठाणे जिल्हा व्यवसाय शिक्षण प्रशिक्षणाधिकारी अनिल सदाफुले, ‘ठाणे औद्योगिक प्रशिक्षण संस्था'च्या प्राचार्य स्मिता माने, ‘शासकीय तांत्रिक विद्यालय'चे मुख्याध्यापक टिकोले यांच्यासह राजमाता जिजाऊ औद्योगिक प्रशिक्षण संस्था मधील सर्व कर्मचारी आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.
राज्यातील सर्व औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात ऑनलाईन द्वारे आपत्ती व्यवस्थापनाच्या कार्यशाळा होणार आहेत. आपत्ती व्यवस्थापन काळाची गरज आहे. आपत्ती मानव निर्मित असो किंवा नैसर्गिक असो, आपत्तीचे व्यवस्थापन आणि बचाव कसा करावा, याचे प्रशिक्षण प्रत्येक नागरिकाने घेण्याची गरज आहे. मानवाने प्रगती केली असली तरी, आपत्तीचे स्वरुप त्यानुसार बदलले असून, बचावाचे प्रशिक्षण नव्या पिढीला देण्याचा राज्य सरकारचा उद्देश आहे, असे ना. मंगलप्रभात लोढा यांनी यावेळी नमूद केले.
या दोन दिवसीय शिबिरात ‘अनिरुध्दाज अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट'चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील मंत्री यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. याशिवाय राज्याचे माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी राज्यातील आयटीआय विद्यार्थी-विद्यार्थिनींना ‘नागरी संरक्षण' या विषयावर ऑनलाईन माहिती दिली.
राजमाता जिजाऊ औद्योगिक प्रशिक्षण संस्था मधील शिबिराच्या सुरुवातीला डॉ. लीना गडकरी यांनी आपत्ती व्यवस्थापन संकल्पना नेमकी काय, याची माहिती विद्यार्थी-विद्यार्थिनींना दिली. या दोन दिवसीय शिबिरात बचाव आणि मदतकार्य याचे प्रशिक्षणही देण्यात आले. मानव निर्मित आपत्ती यात युध्दाचा समावेश असून, त्या काळात घ्यायची काळजी, उपचार आणि बचाव यावरही विद्यार्थी-विद्यार्थिनींना माहिती देण्यात आली. यावेळी ना. मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थितीत बचावाची प्रात्यक्षिके विद्यार्थिनींनी सादर केली. यावेळी आभार प्रदर्शन ‘राजमाता जिजाऊ औद्योगिक प्रशिक्षण संस्था'च्या प्राचार्य एस. एस. माने यांनी केले.