प्रतिक्षा संपली! गव्हाण फाटा रेल्वे क्रॉसिंग पुल वाहतुकीसाठी खुला
ईटीसी केंद्रातील ‘ओजस'चे राज्यस्तरीय स्पेशल ऑलिम्पिक स्पर्धेत सुयश
नवी मुंबई : ‘नमुंमपा'चे ईटीसी केंद्र नवी मुंबई शहरातील दिव्यांग मुलांच्या शिक्षण, प्रशिक्षणासाठी सातत्याने प्रयत्नशील असते. दिव्यांग मुलांमधील सुप्त कलागुणांना वाव मिळण्यासाठी केंद्रामार्फत सातत्याने प्रयत्न केले जातात. याकरिता विविध स्तरांवर स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी दिव्यांग मुलांना प्रोत्साहन दिले जाऊन त्यांच्या सहभागासाठी प्रयत्न केला जातो.
८ डिसेंबर रोजी अहिल्यानगर येथे डॉ. वि्ीलराव विखेपाटील फाऊंडेशन आणि जनसेवा फाऊंडेशन, लोणी यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न झालेल्या स्पेशल ऑलम्पिक भारत महाराष्ट्र स्पर्धा अंतर्गत राज्यस्तरीय सायकलिंग आणि ज्युडो स्पर्धा यांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विळदघाट बायपास महामार्गावर दिव्यांग मुलांची विशेष सायकल स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत नमुंमपा ईटीसी केंद्रामधील मतिमंद विभागातील ओजस राहुल अडागळे याने ५ कि.मी.चे अंतर जलद पार करीत सायकलिंग स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकाविला. या स्पर्धेमध्ये मुंबई, कोल्हापूर, पुणे, नाशिक, अमरावती, रायगड, ठाणे, वाशिम, धाराशिव, सोलापूर, अहिल्यानगर अशा विविध जिल्ह्यांतील दिव्यांग मुले सहभागी झाली होती.
यावेळी स्पेशल ऑलम्पिक भारत महाराष्ट्र अध्यक्ष डॉ.सोमैय्या, जिल्हाध्यक्ष धनश्री विखे पाटील, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांच्यासह राज्यभरातील क्रीडा शिक्षक, पालक आणि दिव्यांग खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ओजसने मिळवलेल्या यशाबद्दल महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी अभिनंदन केले असून त्याची कामगिरी इतरांसाठी प्रेरणादायक असल्याचे सांगितले आहे. अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार आणि ईटीसी संचालिका डॉ. अनुराधा बाबर यांनीही ओजस अडागळेचे अभिनंदन करीत त्याला प्रोत्साहन देणाऱ्या पालकांचे तसेच ईटीसी टीमचे कौतुक केले आहे.