नाट्यगृह नामकरणाचा वाद चिघळला

अंबरनाथ : अंबरनाथ शहरात पश्चिम भागात असलेल्या सर्कस मैदानावर नव्याने उभारण्यात आलेल्या नाट्यगृहाच्या नामकरणावरुन मोठा राजकीय आणि सामाजिक वाद निर्माण झाला आहे. या नाट्यगृहाला कोणाचे नाव द्यायचे? यावरुन राजकीय नेते आणि विविध सामाजिक संघटनांमध्ये मतभेद दिसून येत आहेत. आतापर्यंत ३ वेगवेगळ्या व्यक्तींची नावे चर्चेत आली असून, त्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना निवेदने सादर करण्यात आली आहेत.

अण्णाभाऊ साठे आणि आनंद दिघे यांचे नाव चर्चेत...

आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नाव देण्याची शिफारस केली आहे. या मागणीला ‘लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नामकरण संघर्ष समिती'नेही पाठिंबा दिला आहे. ‘समिती'चे अध्यक्ष सुनील अहिरे, उपाध्यक्ष शत्रुघ्न उमाप, कार्याध्यक्ष प्रकाश जाधव आणि सचिव विजय हनवते यांनी दिलेल्या निवेदनानुसार, अण्णाभाऊ साठे यांचे संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील योगदान, त्यांचे विपुल साहित्य आणि रशियन सरकारने केलेला गौरव यामुळे त्यांचे नाव देणे योग्य ठरेल. तसेच अण्णाभाऊ साठे यांच्या नावाला ४० पेक्षा जास्त संघटनांनी पाठिंबा दिला असल्याचे म्हटले आहे.

दुसरीकडे ‘शिवसेना'चे शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांनी धर्मवीर आनंद दिघे यांचे नाव देण्याची मागणी केली आहे. त्यांच्या मते नाट्यगृह खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून नाट्यगृह साकार झाले असून सदर नाट्यगृह स्थानिक कलावंतांना व्यासपीठ मिळवून देईल. आनंद दिघे यांचे ठाणे जिल्ह्याच्या सांस्कृतिक आणि कलाविश्वातील योगदान मोठे आहे. मराठी कलावंतांसाठी त्यांनी केलेले कार्य आणि त्यांच्यावरील जनसामान्यांचे प्रेम लक्षात घेता, त्यांचे नाव दिल्यास नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होईल.

या दोन नावांव्यतिरिक्त अंबर भरारी या सामाजिक संघटनाने ज्येष्ठ नाटककार बाळकृष्ण कोल्हटकर यांचे नाव नाट्यगृहाला देण्याची मागणी या पूर्वीच केली होती. अंबरनाथमध्ये कोल्हटकर यांचे वास्तव्य होते आणि त्यांचे पूर्वीचे घर विकासाच्या नावाखाली पाडण्यात आले होते. त्यांच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी त्यांचे नाव योग्य ठरेल, असे ‘अंबर भरारी'चे म्हणणे आहे.

नाट्यगृहाची वैशिष्ट्येः
अंबरनाथ (पश्चिम) येथे अंबरनाथ नगरपालिका कार्यालयाच्या मागील बाजुस असलेल्या सर्कस मैदानावर उभारण्यात येत असलेले अत्याधुनिक नाट्यगृह सुमारे पावणे दोन एकर जागेवर उभे रहात आहे. यात ५०० आसन क्षमता असून जास्तीत जास्त चांगल्या सुविधा पुरविण्यात येतील, असा दावा नगरपालिका प्रशासनाने केला आहे. अंदाजे १५ ते २० कोटी खर्च या नाट्यगृहाला झाला आहे. सध्या एकाच नाट्यगृहासाठी ३ दिग्गज व्यक्तींच्या नावांची शिफारस झाल्याने सदर तिढा कसा सुटणार आणि अंतिम निर्णय काय होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

नवी मुंबई मध्ये पावसाचा जोर; सखल भाग जलमय