विद्यार्थिनी आत्महत्या प्रकरणी मुख्याध्यापिकेविरोधात ‘ॲट्रॉसिटी'नुसार गुन्हा

नवी मुंबई : ऐरोलीतील श्रीमती सुशीला देवी देशमुख विद्यालयात दहावी मध्ये शिकणारी विद्यार्थिनी अनुष्का केवळे हिने शिक्षकांकडून झालेल्या कथित अपमानामुळे आत्महत्या केल्याच्या प्रकरणात नवी मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई करत शाळेच्या मुख्याध्यापिकेविरोधात अनुसूचित जाती-जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली असून विद्यार्थिनीच्या आत्महत्येबद्दल समाजात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

या घटनेनंतर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा ‘रिपब्लिकन पक्ष'चे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी ८ ऑवटोबर रोजी नौसील नाका येथील अनुष्काच्या निवासस्थानी भेट देऊन तिच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. त्यांनी या दुर्दैवी घटनेचा तीव्र निषेध नोंदवला आणि जबाबदारांवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी केली.

शिक्षकांकडून विद्यार्थ्यांवर होणारा मानसिक छळ अत्यंत गंभीर गुन्हा आहे. शाळा विद्यार्थ्यांच्या भवितव्याची दिशा ठरवणारी जागा असते. परंतु, अशा ठिकाणीच जर अपमानास्पद वर्तन होत असेल, तर ती व्यवस्था दुरुस्त करणे आवश्यक आहे. त्यामुळे या प्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा झाली पाहिजे, असे मत ना. रामदास आठवले यांनी व्यक्त केले. तसेच त्यांनी अनुष्काच्या कुटुंबाला सर्वतोपरी न्याय मिळावा यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.

या भेटीप्रसंगी ‘रिपब्लिकन पक्ष'चे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सिद्राम ओहोळ, नवी मुंबई जिल्हाध्यक्ष महेश खरे, सरचिटणीस एल. आर. गायकवाड, कार्याध्यक्ष विजय कांबळे, उपाध्यक्ष टिळक जाधव, युवक अध्यक्ष ॲड. यशपाल ओहोळ, जिल्हा प्रवक्ते सचिन कटारे, आदि पदाधिकारी उपस्थित होते.

घटनेचा तपशीलः
ऐरोली, सेक्टर-४ मधील श्रीमती सुशीलादेवी देशमुख विद्यालयात शिकणाऱ्या अनुष्काला ४ ऑवटोबर परीक्षेदरम्यान कॉपी केल्याच्या संशयावरुन शिक्षकांनी पकडले होते. त्यानंतर शाळेच्या मुख्याध्यापिका देशमुख यांनी तिचा सर्वांसमोर अपमान करुन अत्यंत कठोर शब्दांत वागणूक दिल्याचा आरोप आहे. त्यानंतर मानसिक तणावाखाली आलेल्या अनुष्काने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती.
या घटनेनंतर रबाले पोलिसांनी मुख्याध्यापिकेविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. पुढील तपासात अनुष्का अनुसूचित जातीतील असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी आता या गुन्ह्यात अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार कलमे जोडली आहेत.

‘रिपब्लिकन पक्ष'ने या प्रकरणात न्याय्य चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा देण्याची तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी शाळा प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या मानसिक आणि शैक्षणिक सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

तब्बल २१ तासानंतर विद्युत पुरवठा सुरळीत