प्रतिक्षा संपली! गव्हाण फाटा रेल्वे क्रॉसिंग पुल वाहतुकीसाठी खुला
नोकरीच्या नावाखाली ४३ कोटींचा गैरव्यवहार
अंबरनाथ : नोकरी देण्याचे आमिष दाखवून तरुणांच्या कागदपत्रांचा गैरवापर करत त्यांच्या नावे बनावट कंपन्या आणि बँक खाती उघडून तब्बल ४२ कोटी ९१ लाख रुपयांचे संशयास्पद व्यवहार केल्याचा धक्कादायक प्रकार अंबरनाथमध्ये समोर आला आहे. याप्रकरणी अंबरनाथ पश्चिम पोलिसांनी मुख्य आरोपी सलमा सय्यद आणि तिच्या साथीदारांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
अमर रतिराम जैसवार या २७ वर्षीय तरुणाने दिलेल्या तक्रारीनुसार, जुलै २०२४ पासून सलमा सय्यद आणि तिच्या साथीदारांनी त्यांना चांगल्या पगाराच्या नोकरीचे आमिष दाखवले होते. नोकरीसाठी पगाराचे खाते उघडायचे असल्याचे सांगून आरोपींनी फिर्यादीकडून आधारकार्ड, पॅनकार्ड आणि फोटो मिळवले. मात्र, नोकरी देण्याऐवजी आरोपींनी या कागदपत्रांचा गैरवापर करत फिर्यादीच्या बनावट सह्या केल्या आणि त्यांच्या नावावर ‘जलज्योती एंटरप्रायझेस' नावाची कंपनी स्थापन केली.
सदर फसवणुकीचा प्रकार इतक्यावरच थांबला नाही, तर आरोपींनी या बनावट कंपनीच्या नावाने ॲक्सिस आणि एचडीएफसी बँकेत खाती उघडली. या खात्यांमधून अनुक्रमे ७ कोटी ९ लाख आणि ३५ कोटी ८२ लाख असे एकूण ४२ कोटी ९१ लाख ३१ हजार २२० रुपयांचे प्रचंड आर्थिक व्यवहार करण्यात आले. आपल्या नावावर एवढ्या मोठ्या प्रमाणावर व्यवहार झाल्याचे आणि बनावट कंपन्या उघडल्याचे लक्षात येताच फिर्यादीने पोलिसात धाव घेतली. या प्रकारामुळे तरुणांची सामाजिक प्रतिष्ठा मलीन झाली असून शासनाचा मोठा कर बुडवून सदर फसवणूक करण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षक राजनंदिनी पाटील या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, या रॅकेटमध्ये आणखी किती जणांची फसवणूक झाली आहे, याचा शोध पोलीस घेत आहेत.