सानपाडा येथील हुतात्मा बाबू गेनु सैद मैदानातील अवैध पार्किंगवर कारवाई

तुर्भे : सानपाडा येथील नवी मुंबई महापालिका हुतात्मा बाबू गेनू सैद मैदानाची विविध कारणांमुळे दुरवस्था झाल्याची बातमी वृत्तपत्रांमध्ये प्रसिध्द झाल्याची दखल घेत महापालिका प्रशासनाने हुतात्मा बाबू गेनू सैद मैदानातील अवैध पार्किंगवर धडक कारवाई केली आहे. या कारवाईबद्दल स्थानिक खेळाडूंनी समाधान व्यक्त केले आहे.

सानपाडा परिसरामध्ये चांगल्या प्रकारे खेळाची  मैदाने तसेच उद्याने उपलब्ध आहेत. परंतु, हुतात्मा बाबू गेनू सैद मैदानाच्या आजूबाजूला असलेला सोसायटीमधील रहिवाशी या मैदानामध्ये त्यांच्या गाड्या पार्क करत असतात. या गाड्या दिवसभर आणि रात्रीही हुतात्मा बाबू गेनू सैद मैदानात उभ्या असतात. गाड्यांचे नुकसान होऊ नये यासाठी मुलांना या मैदानात खेळण्यास मनाई केली जात होती. यामुळे लहानग्यांच्या आनंदावर विरजण पडत होते. याच मैदानामध्ये एक अतिक्रमित पोलीस ठाणे होते. या सानपाडा पोलीस ठाणे मागील बाजूस गुन्ह्यात सापडलेल्या गाड्या बेवारस स्थितीमध्ये धुळखात पडून होत्या. तसेच मैदानात नियमितपणे स्वच्छता केली जात नसल्याने ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग याचले होते. नवी मुंबई महापालिका आयुक्त कैलास शिंदे यांनी २६ डिसेंबर रोजी तुर्भे येथील निवडणूक कार्यालयाचा दौरा केला. त्यानंतर महापालिका आयुक्त कैलास शिंदे सानपाडा येथील पामबीच मार्गे पुढे जात असताना त्यांना हुतात्मा बाबू गेनू मैदानाची दुरवस्था निदर्शनास आली. त्यानंतर महापालिका आयुक्त कैलास शिंदे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सदर ठिकाणी कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार नवी मुंबई महापालिका तुर्भे विभाग अधिकारी सागर मोरे यांच्या नेतृत्वाखाली अधीक्षक अनिल भोईर यांनी अतिक्रमण विरोधी पथकाच्या सहाय्याने हुतात्मा बाबू गेनू सैद मैदानात पार्क केलेल्या गाड्यांवर कारवाई केली. तसेच काही गाड्या जप्त करुन डंपिंग ग्राउंडवर नेण्यात आल्या आहेत.

दरम्यान, सानपाडा येथील नवी मुंबई महापालिका हुतात्मा बाबू गेनू सैद मैदानाची साफसफाई करण्यात आली असून, कोणीही मैदानामध्ये गाडी पार्किंग करु नये यासाठी मैदानाच्या दरवाजांना टाळे लावण्यात आले आहे. मुलांना मैदान खेळण्यासाठी उपलब्ध करुन देण्यात आले आहे. यापुढे मैदानात कोणी अवैध पार्किंग केली, तर संबंधितांवर गुन्हा नोंद करण्यात येणार आहे, अशी माहिती नवी मुंबई महापालिका उपायुक्त (अतिक्रमण) डॉ. कैलास गायकवाड यांनी दिली. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

साप्ताहिक वारानुसार कचरा उचलण्यामुळे अनेक ठिकाणी डंम्पिंग ग्राऊंड