नवी मुंबई महापालिकेवर ‘महायुती'चाच झेंडा -उपमुख्यमंत्री शिंदे

नवी मुंबई : नगरपालिका आणि नगरपरिषद निवडणुकांमध्ये ‘महाविकास आघाडी'ला एकत्रित मिळालेल्या जागांपेक्षा अधिक जागा ‘शिवसेना'ला मिळाल्या आहेत. नवी मुंबईत शिवसेना पक्षाची ताकद वाढत असल्याचे स्पष्ट आहे. त्यामुळे गाफील न राहता सर्वांनी एकदिलाने कामाला लागावे आणि नवी मुंबई महापालिकेवर ‘महायुती'चा भगवा फडकवावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

‘शिवसेना'तर्फे ऐरोली मधील लक्ष्मी-नारायण सभागृह येथे २१ डिसेंबर रोजी ‘पदाधिकारी मेळावा'चे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी खासदार नरेश म्हस्के, उपनेते विजय चौगुले, उपनेते विजय नाहटा, जिल्हाप्रमुख द्वारकानाथ भोईर, जिल्हाप्रमुख किशोर पाटकर, अंकुश कदम, शिवराम पाटील, रमाकांत म्हात्रे, रोहिदास पाटील, मनोज हळदणकर, अशोक गावडे, अनिकेत म्हात्रे, विजय माने, शीतल कचरे  यांच्यासह इतर पदाधिकारी, महिला आघाडी, ‘युवा सेना'चे पदाधिकारी, माजी नगरसेवक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या मेळाव्यात ‘राष्ट्रवादी अजित पवार गट'चे नवी मुंबई जिल्हाप्रमुख नामदेव भगत, त्यांची पत्नी इंदुमती भगत, समाजसेवक किशोर पाटील, माजी नगरसेविका तनुजा मढवी यांच्यासह अन्य विविध पक्षांतील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी ‘शिवसेना'मध्ये प्रवेश केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

नगरपालिका निवडणुकांमध्ये ‘असली शिवसेना कोणाची' याचा फैसला जनतेने केला आहे. ‘महाविकास आघाडी'चा एकत्रित आकडा सिंगल डिजिटमध्ये राहिला, तर ‘शिवसेना'चा आकडा त्यापेक्षा अधिक आहे. लोकसभा, विधानसभा आणि नगरपालिका निवडणुकांनंतर आता महापालिकेतही ‘महायुती'चाच भगवा फडकणार, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. शिवसेना मालक-नोकरांचा नव्हे, तर कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. जो काम करेल तोच पुढे जाईल, असे ठामपणे सांगत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी राज्यभरातील कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले. शिवसेना आता केवळ मुंबई-ठाण्यापुरती मर्यादित नसून चांदा ते बांधापर्यंत पोहोचली असल्याचे त्यांनी नमूद केले.

नवी मुंबईसाठी अडीच वर्षांच्या कारकिर्दीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. ‘सिडको'ची घरे, एफएसआय वाढ, टोल नाके हटवणे, पूल-रस्ते प्रकल्प, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, ‘तिसरी मुंबई' ग्रोथ सेंटर यांसारखे प्रकल्प नवी मुंबईसाठी गेम चेंजर ठरत असल्याचे ना. एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. लाडकी बहीण योजना, लखपती योजना, एसटी प्रवास सवलत, उच्च शिक्षण मोफत, शेतकरी सन्मान योजना यांचा उल्लेख करताना कोई माई का लाल आला तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, असे ठाम आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

महापालिका निवडणुकीत शाखा-शाखांमधून काम करा, नाराजी असल्यास संवादातून ती सोडवा आणि विकास हाच अजेंडा ठेवा, असे आवाहन त्यांनी केले. आरोपांना उत्तर कामातून द्यायचे आहे. गाफील राहू नका, असा संदेश देत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी कार्यकर्त्यांना सज्ज राहण्याचे आवाहन केले. नवी मुंबईची निवडणूक शहराच्या विकासाचा आणि पुढील पिढ्यांच्या भवितव्याचा निर्णय करणारी असल्याने सर्वांनी एकदिलाने काम करुन ‘महायुती'चा विकासाचा भगवा फडकवावा, असे आवाहनही त्यांनी शेवटी केले. 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

३ वर्षानंतर भिवंडीतील प्रशासकीय राजवट संपुष्टात येणार