प्रतिक्षा संपली! गव्हाण फाटा रेल्वे क्रॉसिंग पुल वाहतुकीसाठी खुला
परदेशी नोकरीच्या आमिषाने फसवणूक
नवी मुंबई ः परराष्ट्र मंत्रालयाचा आवश्यक परवाना नसतानाही परदेशात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून बेरोजगार तरुणांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या सीबीडी-बेलापूर येथील ३ बोगस एचआर आणि मॅनपॉवर सप्लाय कंपन्यांवर नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने एकाचवेळी छापे टाकून मोठी कारवाई केली. या कारवाईत तब्बल १५४ पासपोर्ट आणि महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली असून ८ जणांना अटक करण्यात आली आहे.
सीबीडी-बेलापूर परिसरात कार्यरत असलेल्या या कार्यालयांकडे भारतीय नागरिकांना परदेशात नोकरीसाठी पाठवण्यासाठी आवश्यक असलेला दिल्ली येथील परराष्ट्र मंत्रालयाचा अधिकृत परवाना नसतानाही इच्छुक उमेदवारांकडून बेकायदेशीररित्या पैसे स्वीकारुन त्यांना विदेशात पाठवण्याचे खोटे आश्वासन दिले जात असल्याची माहिती मुंबई येथील परराष्ट्र मंत्रालयातील अधिकारी राजेशकुमार यांना मिळाली होती. त्यांनी सदर माहिती नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेला दिल्यानंतर वरिष्ठांच्या आदेशानुसार गुन्हे शाखा युनिट-२ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली ३ स्वतंत्र पथके तयार करण्यात आली.
यानंतर २६ डिसेंबर रोजी दुपारी पोलिसांनी सीबीडी-बेलापूर, सेक्टर-१५ मधील विष्णू कॉम्प्लेक्स येथील एच. आर. ग्लोबल, सेक्टर-११ मधील हिल्टन सेंटर येथील व्हिजन अरेबिया एच. आर. सोल्युशन तसेच साई चेंबर्स येथील ब्राईट टेक मरीन सर्व्हिसेस या ३ कार्यालयांवर एकाचवेळी छापे टाकले. तपासादरम्यान एच. आर. ग्लोबल कार्यालयातून १३६ पासपोर्ट, ब्राईट टेक मरीन सर्व्हिसेस येथून १1८ पासपोर्ट, तर व्हिजन अरेबिया कार्यालयातून विविध महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली.
अधिक चौकशीत या तिन्ही कंपन्यांचे चालक आणि कर्मचारी परराष्ट्र मंत्रालयाचा आवश्यक परवाना नसतानाही परदेशी नोकरीचे आमिष दाखवून उमेदवारांकडून बेकायदेशीररित्या पैसे उकळत असल्याचे उघड झाले. त्यानुसार गुन्हे शाखेने या प्रकरणी रोचक जोशी (३०) याच्यासह सचिन साठले (४५), अमित कदम (४१), देविदास धनगर (३८) आणि सागर चोरट (३३) यांच्यासह एकूण ८ जणांविरुध्द सीबीडी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३१८(२), ३१८(४) तसेच उत्प्रवास अधिनियम १९८३ चे कलम १० आणि २४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तसेच पुढील चौकशीसाठी सर्वांना ताब्यात घेतले आहे.
या तिन्ही कंपन्यांनी नेमकी किती बेरोजगारांची फसवणूक केली आहे, ते अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिसांनी या रॅकेटमुळे फसवणूक झालेल्या नागरिकांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, परदेशात नोकरी लावून देण्याच्या नावाखाली होणाऱ्या फसवणुकीपासून नागरिकांनी सतर्क राहावे आणि कोणत्याही एजन्सीकडे पैसे देण्यापूर्वी परराष्ट्र मंत्रालयाचा अधिकृत परवाना तपासावा, असे आवाहन नवी मुंबई पोलिसांनी केले आहे.