प्रतिक्षा संपली! गव्हाण फाटा रेल्वे क्रॉसिंग पुल वाहतुकीसाठी खुला
तळोजामध्ये घरगुती सिलेंडरचा स्फोट; ३ जखमी
खारघर : तळोजा फेज-१ वसाहत मधील अंबिका स्टील सेंटर या दुकानात १ फेब्रुवारी रोजी दुपारी १२.३०च्या सुमारास घरगुती गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट झाला. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली. अग्निशमन जवानांनी वेळीच उपाय योजना केल्यामुळे पुढील अनर्थ टळला. दरम्यान, या स्फोटात २ महिला आणि एक पुरुष गंभीर जखमी झाले असून, त्यांना कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे समजते.
तळोजा फेज-१ सेक्टर-९ देवाशिष इमारतीत असलेल्या दुकान गाळ्यात अंबिका स्टील सेंटरमध्ये नियमित कामकाज सुरु होते. दुकानात झेरॉक्स तसेच गृहउपयोगी वस्तंची विक्री होत असल्यामुळे ग्राहक नियमित असतात. मिळालेल्या माहिती नुसार दुकानात अनधिकृतपणे घरगुती गॅस सिलेंडरची विक्री केली जात असे, त्यामुळे दुकानात काही भरलेले सिलेंडर दुकानाच्या समोरील बाजूस ठेवण्यात आले होते. १ फेब्रुवारी रोजी दुपारी १२.३०च्या सुमारास त्यातील एका सिलेंडरचा अचानक स्फोट झाला. या स्फोटामुळे दुकानातील सामानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या स्फोटात २ महिला आणि एक पुरुष गंभीर जखमी झाले आहेत. स्फोटानंतर तात्काळ स्थानिक नागरिकांनी मदतीस धाव घेत जखमींना बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले.
सदर घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यावेळी अग्निशमन दलाने तत्काळ परिस्थिती नियंत्रणात आणत आग पसरण्यापासून रोखली. तसेच जखमींना कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते. मात्र, या स्फोटाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. गॅस गळतीमुळे स्फोट झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करुन तपास सुरू केला असून, दुकानात सुरक्षा नियमांचे पालन होत होते का?, याचीही चौकशी केली जात आहे.
नागरिकांनीही गॅस गळतीचा वास येताच तात्काळ संबंधित यंत्रणांना कळवावे, असे आवाहन अग्निशमन केंद्राकडून करण्यात आले आहे. अंबिका स्टीलमध्ये सिलेंडरचा स्फोट झाल्यावर दुकानातील २ सिलेंडरचे झाकण उडून गेल्याचे अग्निशमन जवानांच्या निदर्शनास येताच जवानांनी गॅस गळती रोखण्यासाठी सिलेंडर बाहेर काढून त्यावर पाण्याची फवारणी करताना दिसून आले.
मिळालेल्या माहिती नुसार तळोजा वसाहत मधील अनेक स्टीलच्या दुकानात ५ किलो सिलेंडर विक्रीसाठी ठेवत असल्याचे इतर दुकानदारांकडून समजले. देवाशिष बिल्डींग मधील दुकानात अनधिकृतपणे गॅस सिलेंडरची विक्री करुन इमारतीमधील रहिवाशांचा जीव धोक्यात घालणाऱ्या दुकानदारावर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी रहिवाशांकडून करण्यात आली आहे.
सिलेंडर स्फोट झालेल्या तळोजा येथील अंबिका स्टील सेंटर या दुकानातून १४ किलोचे ५ आणि ५ किलोचे काही सिलेंडर जप्त करण्यात आले आहे. स्टील दुकानातून ५ किलोचे अनधिकृतपणे सिलेंडर विक्री होत असल्याचे समजते. अशा प्रकारे दुकानदारांनी सिलेंडर विक्री करु नये, असे आवाहन करण्यात येत आहे.
- सौरभ पाटील, अग्निशमन अधिकारी, खारघर अग्निशमन केंद्र.