‘शहिदी समागम'च्या तयारीचा जिल्हाधिकारी पांचाळ यांच्याकडून आढावा

ठाणे : ‘हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादूर' यांच्या ३५०व्या शहिदी समागम वष्राानिमित्त खारघर येथे आयोजित कार्यक्रम समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी सरकारी तसेच अशासकीय यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहन ठाणे जिल्हाधिकारी तथा जिल्हास्तरीय प्रचार-प्रसार समितीचे अध्यक्ष डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले.

खारघर येथील ओव्हल मैदान येथे २१ डिसेंबर रोजी सकाळी ९ ते रात्री १० या वेळेत शहिदी समागमचे आयोजन करण्यात येत आहे. या  कार्यक्रमास देशाचे गृहमंत्री अमित शहा यांची प्रमुख उपस्थिती असणार असून, या कार्यक्रमास शीख, सिकलकर, बंजारा, लबाना, सिंधी व मोहिवाल आणि अन्य सर्व समाजांचे समाजबांधव देखील लाखोंच्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घ्ोण्यासाठी जिल्हा नियोजन भवन, ठाणे येथे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी तथा ‘हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादूर' जिल्हास्तरीय प्रचार-प्रसार समितीचे सनियंत्रक आणि समन्वयक डॉ. संदीप माने, ठाणे जिल्हा नियोजन अधिकारी वैभव कुलकर्णी, भिवंडी तहसिलदार अभिजित देशमुख, अंबरनाथ तहसिलदार अमित पुरी, उल्हासनगर तहसिलदार कल्याणी कदम, नवी मुंबई महापालिका उपायुक्त किसनराव पालांडे, सहायक पोलीस आयुक्त विक्रम कदम, प्र.माहिती अधिकारी प्रवीण डोंगरदिवे,  उल्हासनगर, ठाणे, कल्याण डोंबिवली महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी, विविध विभागातील अधिकारी, ‘हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादूर' जिल्हास्तरीय प्रचार-प्रसार समितीचे अशासकीय सदस्य अमरसिंह कलसी, मेहेरसिंह रंधवा, तस्वीरसिंह, सीख, सिकलकर, बंजारा, लबाना, सिंधी, मोहिवाल समाजाच्या गुरुव्दारा आणि संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

या बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ यांनी शहिदी समागम कार्यक्रमाबद्दल माहिती दिली. सदर कार्यक्रम तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न असून शीख, सिकलकर, बंजारा, लबाना, सिंधी व मोहियाल समाजांचे श्री गुरू तेग बहादूर साहबजी यांच्याशी असलेले ऐतिहासिक नाते संबंधित अधिक दृढ होऊन राष्ट्रीय, सामाजिक व धार्मिक ऐक्य वृध्दींगत करण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

या कार्यक्रमास ठाणे आणि रायगड जिल्हयासह राज्यभरातून  शीख, सिकलीगर, बंजारा, लबाना, मोहयाल व सिंधी समाजबांधव मोठ्या संख्येने जाणार आहे. ठिकठिकाणाहून खारघर, नवी मुंबई येथे येणाऱ्या भाविकांची वाहतूक व्यवस्था, चहा, पाणी, नास्ता, वैद्यकीय मदत, सुरक्षा आदींसह विविध बाबींचे सूक्ष्म नियोजन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत असून त्याची माहिती यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली.

दरम्यान, कार्यक्रमाचे नियोजन सुरळीत, सुरक्षित आणि शिस्तबध्द रितीने पार पडावे यासाठी शीख, सिकलीगर, बंजारा, लबाना, मोहयाल आणि सिंधी समाजबांधवांनी स्वयंसेवक म्हणून सहभाग नोंदवावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ यांनी यावेळी केले. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

घोडबंदर रोडवरील प्रकल्प कामे तातडीने पूर्ण करा