‘नवी मुंबई भाजपा'चा विकासाचा जाहीरनामा प्रसिध्द

पुढील २० वर्षे करवाढ नाही : ना. गणेश नाईक

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘भाजपा'चा जाहीरनामा ८ जानेवारी रोजी प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते प्रसिध्द करण्यात आला. यावेळी माजी खासदार तथा निवडणूक प्रमुख डॉ. संजीव नाईक, भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ. राजेश पाटील, माजी आमदार संदीप नाईक, माजी महापौर सागर नाईक यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

नवी मुंबईच्या विकासाचे पुढील ३० वर्षांचे व्हिजन तयार केल्याचे सांगत वनमंत्री गणेश नाईक यांनी वाढती लोकसंख्या लक्षात घेता पोशीर धरण उभारुन शहराच्या पाणीपुरवठ्याची कायमस्वरुपी व्यवस्था करण्यात येईल, अशी घोषणा केली. मागील २५ वर्षे मालमत्ता कर आणि पाणीपट्टी वाढवली नाही, आता पुढील २० वर्षेही करवाढ न करता शहराचा वेगवान विकास केला जाईल, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. तर प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी दूरदृष्टीपूर्ण धोरणांमुळे नवी मुंबई राज्यात विकासात आघाडीवर असल्याचे सांगून ना. गणेश नाईक यांच्या नेतृत्वात शहराने नवे मानदंड प्रस्थापित केल्याचे नमूद केले.

‘भाजपा'ने प्रसिध्द केलेल्या जाहीरनाम्यात १०० खाटांचा अतिदक्षता विभाग आणि ५०० खाटांचे नवीन रुग्णालय, महापालिकेची सर्व रुग्णालये पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करणे, जर्मन तंत्रज्ञानावर आधारित ऑपरेशन थिएटर्स उभारणे यासारख्या महत्त्वाकांक्षी आरोग्यविषयक घोषणा करण्यात आल्या आहेत. 

त्याचप्रमाणे पीजी ते केजी मोफत शिक्षण, इंग्लिश आणि सीबीएसई माध्यमांच्या अतिरिक्त शाळा, तसेच ५०० चौरस फुटापर्यंतच्या घरांना पूर्ण करमाफी आणि ५०१ ते ७०० चौरस फुटापर्यंतच्या घरांना ६० टक्के करसवलत जाहीर करण्यात आली आहे.

बिल्डरविरहित झोपडपट्टी पुनर्विकास जमिनीच्या मालकी हक्कासह, सिडको सोसायट्यांतील गरजेपोटी बांधकामे नियमित करणे, घणोसली-ऐरोली पामबीच मार्ग, तुर्भे-खारघर रस्ता प्रकल्प, कोपरखैकरणे-विक्रोळी उड्डाणपुल, मल्टिलेव्हल पार्किंग यामुळे वाहतूक कोंडी कमी करण्याचा संकल्प जाहीर करण्यात आला. तसेच महिलांच्या रोजगार-स्वयंरोजगारासाठी विशेष उपक्रम, बचत गटांच्या उत्पादनांसाठी मोक्याच्या जागा, युवकांसाठी कौशल्य विकास केंद्र, ज्येष्ठांसाठी मोफत प्रवास सुविधा कायम ठेवणे आणि विरंगुळा केंद्रांची संख्या वाढविणे यांचा समावेश आहे.

जनरेशन नेक्स्टसाठी नवे धोरण... 

एआय को-वर्किंग स्पेस, कंटेंट क्रिएटिव्ह स्टुडिओ, स्टार्टअपसना प्रोत्साहन, ई-सायकल-ई-स्कूटर आणि फीडर बस सेवा, डिजिटल पार्किंग बुकिंग, स्ट्रेस रिलीफ सेंटर्स, आधुनिक शिशुगृह अशा भविष्योन्मुख संकल्पनांचा जाहीरनाम्यात समावेश करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे सर्व तलाव सुरक्षित करणे, झिरो डस्ट पॉलिसी, सोलर ऊर्जा प्रकल्प, हवा गुणवत्ता सुधारणा, कूल रुफ पॉलिसी, फूड ट्रक आणि फेरीवाला धोरण, खेळाची मैदाने व आधुनिक होर्डिंग पॉलिसी यांद्वारे सुनियोजित आणि पर्यावरणपूरक नवी मुंबई

घडवण्याचा ‘भाजपा'चा निर्धार जाहीरनाम्यात मांडण्यात आला आहे.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

‘शिंदे गट'चा गणेश नाईकांवर जोरदार हल्लाबोल