म्हाडा निर्णयाच्या धर्तीवर सिडकोनेही घरांच्या किंमती कमी करण्याचा निर्णय घ्यावा
‘कविता डॉट कॉम' कार्यक्रमात कन्या जन्माचा उत्सव व नामांकित महिलांचे सत्कार
नवी मुंबई : ‘संवाद नात्यांचा कविता डॉट कॉम' कडून, लेक जन्माचा काव्य उत्सव नामांकित कवी अनंत राऊत यांच्या काव्य मैफलीमधून साजरा करण्यात आला. वाशी येथील साहित्य मंदिर सभागृहात २५ फेब्रुवारी रोजी ‘कविता डॉट कॉम' परिवार प्रमुख रवींद्र पाटील यांनी आपल्या मुलीस मुलगी झाली आपण आजोबा झालो म्हणून आपल्या नातीच्या नामकरण सोहळा आयोजित केला होता. या लेक उत्सवात नवी मुंबईमधील नामांकित महिलांचा सत्कार करण्यात आला. स्त्री मुक्ती संघटनेच्या विश्वस्त प्रा. सौ.वृषाली मगदूम, प्रकल्पग्रस्त महिलांसाठी काम करणाऱ्या सौ.जयश्री पाटील, कवयित्री लेखिका सौ.स्मिता वाजेकर, विज्ञान क्षेत्रात ठसा निर्माण करणाऱ्या, डॉ.शुभदा नायक, नाट्यकर्मी श्रीमती वासंती भगत, पत्रकार सौ.स्वाती नाईक आणि समाज आणि तरुणाचा मनाच्या ठाव घेणारी गझल सादर करणाऱ्या सौ.ज्योत्स्ना राजपूत यांचादेखील सत्कार करून गौरविण्यात आले. सोबतच जागतिक मराठी परिषदेवर कार्यकारिणी सदस्य म्हणून निवड झाल्याने डॉ.अशोक पाटील, तसेच सिनेमा-नाट्यक्षेत्रातील काम करणाऱ्या अशोक पालवे यांचाही सत्कार करून गौरविण्यात आले.
‘कविता डॉट कॉम' कडून मागील दोन वर्षाचा प्रवास मांडण्यात आला. भविष्यात होणारा आनंद आजच्या कष्टात असतो, असेही नमूद करून प्रा.शंकर गोपाळे यांनी या प्रवासात साथ देणाऱ्या सर्वांचे आभार मानले. कवी अनंत राऊत यांनी प्रथमच अशा प्रकारचा लेकीचा नामकरण सोहळा संपन्न होत असल्याचे सांगून, त्यात संत तुकाराम यांच्या तुकाराम गाथा यातील, मुलीचं नाव, गाथा ठेवल्याने खूप आनंद असल्याचे नमूद केले. लेक जन्माचा उत्सव असा घराघरात साजरा झाला पाहिजे, हे नमूद करून त्यांनी त्यांच्या नवीन आणि इतर प्रसिद्ध कविता घेऊन रसिकांना मंत्रमुग्ध केले. सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात आपण वाटचाल करत असताना, सावित्री, जिजाऊ आणि शिवबाची विचारधारा जपली पाहिजे, हे नमूद करून दमदार आवाजात रसिक प्रेक्षकांच्या टाळ्यांच्या साथीने विविध कविता सादर केल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नारायण लांडगे पाटील यांनी केले. कार्यक्रम प्रसंगी आप्पा ठाकूर, सुभाष कुलकर्णी, विलासकाका समेळ, रवींद्र औटी, राजेंद्र घरत, मंदार पनवेलकर, पोळ सर, रमेश सकपाळ, अनिलकुमार उबाळे, मधुकर वारभुवन, प्रा.नाना पाटील, प्रा मनोहर पाटील, दिनेश मिसाळ, प्रताप महाडिक, विविध संस्थांचे पदाधिकारी, प्राचार्य, शिक्षक आणि ‘कविता डॉट कॉम' सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते.