प्रतिक्षा संपली! गव्हाण फाटा रेल्वे क्रॉसिंग पुल वाहतुकीसाठी खुला
मिरा-भाईंदरमध्ये गोंधळाच्या वातावरणात मतदान संपन्न
भाईंदर : मीरा भाईंदर महापालिका मतदानाच्या दिवशी सकाळपासून सर्व मतदान केंद्रावर अत्यंत संथ गतीने सुरु झालेले मतदान दिवस अखेरपर्यंत अदाजे ५५ टक्क्यांपर्यंत झाले. काही मतदान केंद्रांवर गोंधळाचे वातावरण होते तर अनेक केंद्रांवर राजकीय प्रतिस्पर्ध्यांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात येत होते. त्यात बोगस मतदान, पैसे वाटप, शाई निघून जाणे यांचा समावेश होता.
मिरा-भाईंदर महापालिका निवडणुकीत ९५ उमेदवारांसाठी शहरातील ९५८ मतदान केंद्रांवर १५ जानेवारी रोजी सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली. पहिल्या दोन तासात फक्त ७.७३ टक्के मतदान झाले तर पुढल्या दोन तासात १६.६९ टक्के पर्यंत पोहोचले. तर दुपारी १.३० वाजेपर्यंत २८.३० टक्के एवढेच झाले होते. सकाळी मिरा रोड येथील शांती नगर भागातील शाळेच्या केंद्रावर बसलेल्या पोलींग एजंट यांच्या ओळखपत्राच्या मागील बाजुस एका पक्षाच्या ४ उमेदवारांची नावे छापलेली असल्याचे आढळून आल्यामुळे केंद्रावर एकच गोंधळ उडाला. तर काही मतदान केंद्रांवर मतदानासाठी गेलेल्या मतदाराला आपले मतदान झाले असल्याचे सांगण्यात आले, ते जाण्यापूर्वीच बोगस मतदान करण्यात आले होते.
प्रभाग क्र.१६ मध्ये मतदारांना सहाय्य करण्यासाठी असलेल्या राजकीय पक्षाच्या टेबलावर एक डायरी सापडली. त्यामध्ये काही नावे आली, त्याच्यापुढे रक्कम लिहिलेली होती. टेबलवर बसलेल्या कार्यकर्त्यांना याबाबत खुलासा करता न आल्यामुळे इतर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी एकच गोंधळ केला. प्रभाग क्र.१२ मधील मतदान केंद्राच्या बाहेर पैसे वाटप होत असल्याच्या आरोपामुळे काही काळ गोंधळ निर्माण झाला होता. प्रभाग क्र.३ मध्ये २ उमेदवारांच्या समर्थकांमध्ये बाचाबाची झाल्याने वातावरण तंग झाले होते. परंतु, पोलिसांनी वेळीच दखल घेतल्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.
भाईंदर पूर्व भागातील इंद्रलोक येथील तपोवन शाळेतील मतदान केंद्रातील मशिन बंद पडल्याने गोंधळ उडाला होता. तसेच अनेक मतदान केंद्रांवर लावण्यात आलेली शाई निघून जात होती. त्यामुळे दुबार आणि बोगस मतदानाची शक्यता वर्तवली जात होती. मिरा-भाईंदर महापालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी अनेक मतदार केंद्रावर जाऊन पाहणी केली. शहरातील अनेक मतदान केंद्रावर मोठी रांग लागली होती. वयोवृध्द मतदार, दिव्यांग, आजारी मतदार मोठ्या उत्साहात मतदान केंद्रांवर जाऊन मतदान करत असल्याचे दिसून येत होते. मिरा-भाईंदर मध्ये मतदान शांततेत पार पडले असले तरी गोंधळाचे वातावरण मात्र सकाळपासून संध्याकाळपर्यंत सुरु होते.