थकबाकी वसूल करणारे कर्मचारीच थकबाकीदार

महापालिका आयुक्त अनमोल सागर यांच्या भूमिकेकडे नागरिकांचे लक्ष

भिवंडी : गेल्या काही वर्षांपासून भिवंडी महापालिकेच्या मालमत्ता थकबाकीदारांमध्ये वाढ होऊन वसुलीचे आकडे फुगत आहेत. अशा स्थितीत आता मार्च महिन्याच्या शेवटी मोठ्या मालमत्ता थकबाकीदारांकडे धाडी टाकून जास्त रक्कमेची वसुली करीत स्वतःची पाठ थोपटून घेण्याचे प्रकार महापालिकेचे काही अधिकारी गेल्या अनेक वर्षांपासून करीत आहेत. दुसरीकडे शहरातील मालमत्ता थकबाकीदारांकडे मागणी करणाऱ्या महापालिका कर्मचाऱ्यांच्या हाती लागलेल्या यादीमध्ये दस्तुरखुद्द महापालिकेच्याच कर्मचाऱ्यांची नावे आढळून आल्याने महापालिका वर्तुळात खळबळ माजली आहे. यामध्ये काही वसुली कर्मचाऱ्यांचा देखील समावेश असल्याची माहिती महापालिका सुत्रांनी दिली आहे.

शहरातील समस्या सोडवितानाच महापालिका प्रशासनाने नागरिकांना नियमित सुविधा देत त्यांचा विश्वास संपादन करीत वर्षभरात कर वसुली अथवा थकबाकीदारांवर कारवाई करणे अपेक्षित असते. पण, या बाबींकडे दुर्लक्ष करीत भिवंडी महापालिकेचा वसुली विभाग दरवर्षी फेब्रुवारी-मार्च महिन्यात वसुली मोहीम जाहीर करतो आणि महापालिकेतील बहुतांश कर्मचारी वसुलीच्या कामात सहभागी होतात. अशा वेळी शहरातील मोठ्या थकबाकीदारांना लक्ष करीत वसुलीचा मोठा आकडा गाठून दिलेल्या मुदतीनंतर वसुलीला पूर्णविराम दिला जातो.

गेल्या काही वर्षांपासून भिवंडी महापालिकेची वसुली ५० टक्क्यांपर्यंत देखील पोहोचलेली नाही. शहरातील प्रामाणिक नागरिक प्रभाग कार्यालयात पैसे भरण्यास गेले असता काही नागरिकांना संगणक बंद असल्याचा बहाणा करुन परत पाठविले जाते. तर काही जणांनी भरलेली रक्कम त्यांच्या खात्यात जमा होत नसल्याच्या तक्रारी यापूर्वी केल्या होत्या. त्यामुळे नागरिक प्रभाग कार्यालयात कमी जाऊ लागले. या तक्रारीची दाखल घेत महापालिकेच्या तत्कालीन प्रशासनाने वारंवार कॉम्प्युटरचे स्वॉपटवेअर बदलण्याची कारवाई केली. या दरम्यान गौरीपाडा पायल टॉकीज जवळील एका इमारतीची वसुली गायब झाली. अशा प्रकारे शहरात कर आकारणी न झालेल्या इमारती आढळून येत आहे. तर गेल्या काही वर्षांपासून महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी शहरातील इमारतींची दुबार कर नोंदणी झाल्याची वरिष्ठांना माहिती देत वसुलीच्या मूळ रक्कमेला बगल देण्याचे काम करीत असल्याने सदरची वस्तुस्थिती सुधारली जात नाही.

शहरातील एकूण मालमत्तेच्या कर वसुली मधील विस्कळीतपणा दूर करण्याच्या हेतूने महापालिकेच्या एका प्रभाग अधिकाऱ्याने अभ्यासपूर्वक मालमत्ता थकबाकीदारांच्या यादीची माहिती घेतली असता त्यामध्ये महापालिकेच्या विविध पदावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या मालमत्तेची थकबाकी आढळून आलेली आहे. एका प्रभागामध्ये उघडकीस आलेली सदरची मालमत्ता कर थकबाकी २० लाखापेक्षा जास्त आहे. अशाप्रकारे महापालिकेच्या ५ प्रभाग अंतर्गत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या मालमत्तेची थकबाकी कोट्यवधी रुपयांची असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे महापालिका कर्मचाऱ्यांच्या सर्व्हिस बुक मध्ये नोंद केलेल्या मालमत्तेची दाखल घेत त्यावर आकारलेला मालमत्ता कर भरला की नाही? याची शहानिशा करण्याची वेळ आली आहे.

महापालिकाकडे निधी नसल्याने शहरातील विकाकामांसाठी अभय योजना जाहीर करुन शहरातील मालमत्ता धारकांना आवाहन करण्याचे प्रकार मागील काही वर्षापासून होत आहेत. मात्र, नियमित वसुली करण्यासाठी अथवा मालमत्ता थकबाकीदारांवर कारवाई करण्यासाठी प्रयत्न केले जात नाही, असा आरोप नागरिकांमधून केला जात आहे. दरम्यान, भिवंडी महापालिका आयुक्त अनमोल सागर यांनी घेतलेल्या पहिल्याच पत्रकार परिषदेत महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या मालमत्ता कर थकबाकी बाबत विचारणा करण्यात आली. त्यावर आयुक्त अनमोल सागर यांनी सदर विषयाची दखल घेत महापालिका कर्मचाऱ्यांच्या कर थकबाकीबाबत माहिती घेऊन कारवाई करण्याचे आश्वासन दिले.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

स्वच्छतेप्रमाणेच नवी मुंबईला चढतोय सुंदरतेचा साज