पनवेल पंचायत समिती सभापतीपदी रंजना वास्कर तर उपसभापतीपदी भूपेंद्र पाटील
नवी मुंबई महापालिकेचा जागतिक स्तरावर गौरव
नवी मुंबई : ‘वर्ल्ड टॉयलेट समिट-२०२५' या जागतिक स्तरावरील परिषद मध्ये नवी मुंबई महापालिकेला ‘मॅनहोल टू मशीनहोल' या यशस्वी अंमलबजावणी झालेल्या उपक्रमाच्या सादरीकरणासाठी निमंत्रित करण्यात आले होते. अशाप्रकारे आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर आपले उल्लेखनीय उपक्रम मांडण्याची संधी मिळणे, नवी मुंबई महापालिकेचा जागतिक स्तरावर झालेला गौरव आहे.
महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मान्यतेने आणि अतिरिक्त शहर अभियंता अरविंद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, नमुंमपा उपअभियंता स्वप्नील देसाई यांनी ‘मॅनहोल टू मशीनहोल-ऑपरेशन्समधील कार्यक्षमता' या विषयावर ‘नमुंमपा'चे प्रतिनिधित्व करुन प्रभावी सादरीकरण केले. या माहितीपूर्ण सादरीकरणाची विविध देशातील उपस्थित प्रतिनिधींनी प्रशंसा केली. तसेच अनेक देशाच्या प्रतिनिधींनी या मॉडेलचा अभ्यास करुन सदर कार्यप्रणाली अंगीकारण्याबाबत सकारात्मकता दर्शवली. ‘वर्ल्ड टॉयलेट ऑर्गनायझेशन'चे संस्थापक जॅक सीम यांच्या हस्ते नवी मुंबई महापालिकेचा सन्मान करण्यात आला. सदर परिषदला भूतान, कॅनडा, कतार, दक्षिण आफ्रिका, सिंगापूर, थायलंड, बांग्लादेश, स्वीडन आणि इतर देशांतील तसेच भारतातील विविध मोठ्या शहरांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
स्वच्छतेच्या विविध क्षेत्रातील आव्हाने-संधी आणि नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानावर राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांमुळे होत असलेले फायदे तसेच भविष्यातील शाश्वत स्वच्छता प्रणालींचा अभ्यास करण्यासाठी वर्ल्ड टॉयलेट ऑर्गनायझेशन कार्यरत आहे. त्यांच्यामार्फत प्रत्येक वर्षी जागतिक स्तरावर सदर परिषदचे आयोजन करुन आरोग्य, पर्यावरण संरक्षण, सांडपाणी व्यवस्थापन, सुरक्षित स्वच्छता प्रणाली अशा महत्वपूर्ण विषयांवर चर्चा घडवून आणली जाते. याद्वारे माहिती आणि विचारांचे आदान-प्रदान घडवून आणले जाते.
दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या या ‘शिखर परिषद'च्या मंचावरुन जगभरातील विविध क्षेत्रातील मान्यवर तज्ञ, संशोधक, शासकीय पदाधिकारी-अधिकारी, स्वयंसेवी संस्थांचे प्रमुख एकत्र येऊन विचारांचे आदान प्रदान करतात. अशा आंतरराष्ट्रीय स्तरावरील परिषद मध्ये नवी मुंबई महापालिकेच्या मलनिःस्सारण व्यवस्थापनातील स्वच्छता प्रणालीची माहिती देण्यासाठी ‘नमुंमपा'ला आमंत्रित केले जाणे, नवी मुंबई महापालिकेचा जागतिक पातळीवर झालेला गौरव आहे.