महापालिका मालमत्ता कर विभाग तर्फे वसुलीचा विक्रम

पनवेल : पनवेल महापालिका मालमत्ता कर  विभाग तर्फे २०२५-२६ या आर्थिक वर्षात ६९१कोटी रुपये वसुली करण्यात आली असून, सदर मालमत्ता कर वसुली  आतापर्यंतची सर्वांधिक वसुली आहे. पनवेल महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्ता कर विभागाने गेले वर्षभर नियोजनबध्द पध्दतीने रुपरेषा आखून वसुलीचा विक्रम केला आहे. मालमत्ताकर विभागाचे उपायुक्त स्वरुप खारगे यांच्या नियंत्रणाखाली योग्य उपाययोजना राबवत एकूण ६९१ कोटी रुपये इतका महसूल पनवेल महापालिका तिजोरीत जमा झाला आहे.

मागील वर्षी सप्टेंबर महिन्यांपर्यंत ९० टक्के शास्ती मध्ये सूट, त्यानंतर शास्ती मध्ये ७५ टक्के सूट मालमत्ता करांमध्ये देण्यात आली होती. या सर्वांचे फलित म्हणजे या आर्थिक वर्षात आतापर्यंतचा सर्वाधिक म्हणजे एकूण ६९१ कोटी रुपये इतका महसूल महापालिकेच्या तिजोरीत जमा झाला आहे. मालमत्ता विभागाचे उपायुक्त स्वरुप खारगे, कर अधिक्षक महेश गायकवाड आणि सुनील भोईर यांच्या नेतृत्वाखाली चारही प्रभागामंध्ये गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यापर्यंत तसेच  गेला मार्च महिना संपेपर्यंत कर्मचाऱ्यांनी नागरिकांना मालमत्ता कर भरण्यासाठी कोणतीही सुट्टी न घेता शनिवार, रविवारी देखील कार्यालये सुरु ठेवली. महापालिकेचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी मालमत्ता करधारकांकडून महापालिकेने करवसुलीची थेट कारवाई सुरु केली. या वसुलीसाठी महापालिका तर्फे १३ पथके तयार करण्यात आली होती. प्रभाग अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली सदर पथके सर्व प्रभागांमध्ये वसुलीसाठी जात होती.

विकास कामे करण्यासाठी महापालिकेकडे मालमत्ता कर महत्त्वाचे उत्पन्नाचे साधन असल्याने महापालिकेने वेळोवेळी सावध पाऊले उचलली. या आर्थिक वर्षात एकूण १७५३ थकबाकीदारांना जप्ती नोटीस देण्यात आली तर अटकावणी मोहिमेत १७० मालमत्तांवर अटकावणीची कारवाई करण्यात आली, असे महापालिका उपायुक्त स्वरुप खारगे यांनी सांगितले.

महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाकडून वेळोवेळी  मालमत्ताधारकांच्या आक्षेप आणि हरकतीनुसार त्यांच्या बिलात सुधारणा करुन दिली जात आहे. याचबरोबर यापुढेही  मालमत्ताधारकांना त्यांच्या बिलाबाबत कोणत्याही हरकती किंवा सूचना असल्यास त्यानुसार त्यांच्या बिलात सुधारणा करण्याची भुमिका महापालिकेने घेतली आहे. त्यामुळे नागरिकांनी आपल्या सूचना किंवा आक्षेप असल्यास तो नोंदवावा आणि आपला मालमत्ता कर भरुन पनवेल महापालिका क्षेत्रातील विकासास हातभार लावावा, असे आवाहन महापालिका उपायुक्त स्वरुप खारगे यांनी केले आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

भोंदूबाबाच्या निषेधार्थ बेलापूर नेरूळ शाखेची प्रभात फेरी