मराठी भाषेचे अभिजातपण जपतानाच तिच्या विकासाकडेही लक्ष देण्याची प्रत्येकाची जबाबदारी – डॉ.नरेंद्र पाठक
नवी मुंबई : मराठी भाषेचे अभिजातपण मूळचेच आहे, त्यावर मागील वर्षी 3 ऑक्टोबरला सरकारी मान्यतेची मोहोर उमटली. त्याची वर्षपूर्ती होत असून अभिजात मराठी भाषा दिन साजरा करीत असताना मराठी भाषा जास्तीत जास्त बोलली गेली पाहिजे. ही आपल्या सर्वांची जबाबदारी असून त्यादृष्टीने प्रत्येकाने निश्चय केला पाहिजे व तो अंमलात आणला पाहिजे अशा शब्दात साहित्यिक तथा साहित्य अकादमी नवी दिल्लीचे सदस्य डॉ.नरेंद्र पाठक यांनी मनोगत व्यक्त केले.
अभिजात मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून नवी मुंबई महापालिकेच्या वतीने मुख्यालयातील ज्ञानकेंद्रात आयोजित केलेल्या विशेष कार्यक्रमाप्रसंगी डॉ.नरेंद्र पाठक यांनी ‘अभिजात मराठी, अभिमान मराठी’ या विषयावर उपस्थितांशी संवाद साधला.
नवी मुंबई हे मराठी भाषेचा गौरव करणारे शहर असल्याचा अभिप्राय व्यक्त करीत महापालिकेने ठिकठिकाणी उभारलेल्या चित्रकविता भिंतींमधून शहराची वेगळी ओळख निर्माण झाली असल्याचे डॉ.नरेंद्र पाठक यांनी सांगितले. शहरात साहित्यविषयक जाणीवा रुजविण्यासाठी नवी मुंबई महापालिका राबवित असलेल्या वेगवेगळया अभिनव उपक्रमांचे त्यांनी कौतुक केले.
भाषेचे अभिजातपण आणि दैनंदिन व्यवहारातील भाषेचा वापर या दोन वेगवेगळया गोष्टी असल्याचे विविध उदाहरणे देत स्पष्ट करीत डॉ.नरेंद्र पाठक यांनी अभिजात मराठी भाषेचा दर्जा मिळण्याची संपूर्ण प्रक्रीया सविस्तर सांगितली. तामीळ भाषिकांची त्यांच्या भाषेविषयी असलेली अस्मिता आपण अंगीकारण्याची गरज असून त्यांनी ज्या नियोजनबध्द पध्दतीने अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर त्यासाठी तामीळ भाषेविषयी त्यांनी जसे काम केले, तसे काम व्हायला हवे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. मराठी भाषेच्या आजच्या स्थितीला आपणच जबाबदार असून तिच्या विकासाची संपूर्ण जबाबदारी प्रत्येकाची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मराठी भाषेचे अभिजातपण म्हणजे शाश्वतता असून तिचे मूळ संस्कार जपताना प्रचलित मराठी भाषा विकासासाठी व्यक्तीगत पातळीवर प्रत्येकाने सजग राहायला हवे. इंग्रजी माध्यमात शिकणाऱ्या नव्या पिढीला घरातून मराठी भाषेचे बाळकडू लहानपणापासून पाजले गेले तर मराठी भाषा विकसीत होत राहिल असा विश्वास व्यक्त करताना त्यांनी स्वत:च्या नातवंडांवर अजाणत्या वयापासून केलेल्या मराठी भाषेतील संस्काराच्या प्रयोगाची माहिती दिली. अशा प्रयोगांतूनच मराठी भाषा नव्या पिढीच्या मुखी रुळेल अशी खात्री देतानाच भाषा शिकणे म्हणजे ध्वनी, नाद शिकणे असून हे प्रयोग घराघरांतून व्हावेत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
मराठी भाषेकडे नवी पिढी वळण्यासाठी अर्थाजनाच्या संधी मराठी भाषेतून उपलब्ध होणे गरजेचे असल्याचे सांगत त्यादृष्टीने सर्वच पातळयांवरुन प्रयत्न करण्याची गरज आहे. दैनंदिन जीवनात प्रत्येक ठिकाणी मराठी बोलण्याचा आग्रह आपण धरला पाहिजे. कविवर्य कुसुमाग्रजांनी म्हटल्याप्रमाणे, ‘भाषा मरता देशही मरतो, संस्कृतीचाही दिवा विझे’ – हे लक्षात ठेवून मराठी संस्कृतीच्या जपणूकीसाठी जास्तीत जास्त मराठी बोलली गेली पाहिजे, लिहिली गेली पाहिजे असे सार त्यांनी मांडले.
याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार, प्रशासन विभागाचे उपायुक्त किसनराव पलांडे, मुख्य लेखा-वित्त अधिकारी सत्यवान उबाळे, उपायुक्त सोमनाथ पोटरे, संजय शिंदे, संघरत्ना खिल्लारे, डॉ.कैलास गायकवाड, ललिता बाबर, महापालिका सचिव चित्रा बाविस्कर, विधी अधिकारी अभय जाधव, इस्टेट मॅनेजर अशोक अहिरे, कार्यकारी अभियंता सुधीर जांभवडेकर, सहा.आयुक्त ऋतुजा गवळी, शिक्षणाधिकारी सुलभा बारघारे तसेच महापालिका अधिकारी, कर्मचारी, शिक्षक तसेच नवी मुंबईतील साहित्यप्रेमी नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.