ठाणे जिल्हा परिषद शाळांच्या वेळेत बदल

ठाणे : उन्हाच्या तडाख्यामुळे विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या आरोग्यावर होणारा गंभीर परिणाम लक्षात घेऊन ठाणे जिल्हा परिषद शाळांच्या वेळेत महत्वपूर्ण बदल करण्यात आला आहे.

१ एप्रिल पासून ठाणे जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनांच्या शाळेची वेळ सकाळच्या सत्रात प्राथमिक शाळांसाठी वेळ सकाळी ७.०० ते ११.१५ दरम्यान ठेवण्यात आली असून, या वेळेचे वेळापत्रक तयार करण्यात आले आहे, अशी माहिती ठाणे जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बाळासाहेब राक्षे यांनी दिली.

माध्यमिक शाळांसाठी वेळ सकाळी ७.०० ते ११.४५ दरम्यान निश्चित करण्यात आली असून, याबाबत वेळापत्रक तयार करण्यात आले आहे, असे ‘ठाणे जिल्हा परिषद'चे शिक्षणाधिकारी (माध्यमिक) ललिता दहितुले यांनी सांगितले.

राज्यामध्ये वाढलेल्या उन्हाच्या कडाक्यामुळे विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या आरोग्यावर होणारा विपरीत परिणाम टाळण्यासाठी ठाणे जिल्हा परिषद शाळांची वेळ बदलण्यात आली असून, शिक्षक आणि पालकांनी तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनींनी काळजी घ्यावी, असे आवाहन ठाणे जिल्हा परिषद शिक्षण विभागामार्फत करण्यात आले आहे.

विद्यार्थी-विद्यार्थिनींनी घ्यावयाची काळजी
- उन्हाळ्यात विद्यार्थी-विद्यार्थिनींनी मैदानी/शारीरिक हालचाली टाळाव्यात. बाहेर मैदानात वर्ग घेऊ नयेत.
- विद्यार्थी-विद्यार्थिनींना उष्णतेच्या लाटेपासून बचाव करण्यासाठी शिक्षित करावे.
- वर्गामध्ये पंखे सुस्थितीत असल्याची खात्री करणे.
- विद्यार्थी-विद्यार्थिनींना थंड पाणी उपलब्ध करुन द्यावे.
- टरबूज, खरबूज, संत्री, द्राक्षे, अननस, काकडी, कोशिंबिर तसेच स्थानिक उपलब्ध फळे आणि भाज्या यासारखी उच्च पाणी सामग्री असलेली हंगामी फळे आणि भाज्या खाणे.
- पातळ, सैल, सुती आणि शक्यतो हलक्या रंगाचे कपडे घालणे.
- डोके झाकून ठेवण्यासाठी छत्री, टोपी, टॉवेल आणि इतर पारंपारिक साधनांचा वापर करणे.
- उन्हात बाहेर जाताना शूज किवा चप्पल घालणे.
- उन्हात बाहेर पडणे टाळणे. 

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेत नमुंमपा शाळेतील 162 विद्यार्थी झळकले