सर्वपक्षीय संघर्ष समितीचे निवडणुकीवर ‘बहिष्कारास्त्र’; सहा पॅनलवर परिणाम होणार

कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत २७ गावांचा प्रश्न पुन्हा चिघळला आहे. या २७ गावांची स्वतंत्र नगरपालिका व्हावी ही मागणी सरकारकडे लावून धरली होती. मात्र सरकारने आमच्या मागणीचा विचार केला नाही. २७ गावातील नागरिकांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. त्यामुळे सर्वपक्षीय राजकीय नेते, पदाधिकारी आणि इच्छुक उमेदवारांनी कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीवर बहिष्कार घालावा, असे आवाहन सर्वपक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समितीने केले आहे. निवडणूक लढविण्याची तयारी दाखविली तर समिती त्यांच्याविरोधात सक्रिय भूमिका घेणार असल्याचा इशारा समितीचे पदाधिकारी सुमित वझे यांनी दिला आहे.

या संदर्भात २२ डिसेंबर रोजी सायंकाळी समितीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची एक महत्त्वाची बैठक कल्याण ग्रामीणमधील काटई येथे पार पडली. या बैठकीत समितीचे उपाध्यक्ष सत्यवान म्हात्रे यांच्यासह इतर सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. समितीचे पदाधिकारी सुमित वझे यांनी सांगितले की, सरकारची भूमिका २७ गावातील नागरिक, भूमिपुत्र आणि पाच सागरी जिल्ह्यांबाबत उदासीन आहे. सरकारने नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचे आश्वासन दिले होते, ते त्यांनी पाळले नाही. त्याचबरोबर लोकनेते दि. बा. पाटील यांचे स्वप्न होते की, २७ गावांची स्वतंत्र नगरपालिका व्हावी. या मागणीसाठी खासदार सुरेश म्हात्रे यांच्या पुढाकाराने राज्य सरकारकडे २७ गावांची स्वतंत्र नगरपालिका स्थापन करण्याची मागणी केली, त्याला सरकारने प्रतिसाद दिला नाही.

आमच्या तोंडाला पाने पुसली आहेत. त्यामुळे सर्व राजकीय पक्षाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि इच्छुक उमेदवारांनी केडीएमसी निवडणुकीवर बहिष्कार टाकावा, असे समितीने आवाहन केले आहे. याबाबतचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. या निर्णयाच्या विरोधात जाऊन जो कोणी उमेदवार उभा करेल, त्याला समिती सक्रिय सहभाग घेऊन प्रतिउत्तर दिल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा देखील वझे यांनी दिला आहे. समितीने हा निर्णय घेतल्याने १३, १६, १७, १९, ३०, ३१ या सहा पॅनलवर परिणाम होणार आहे.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

कल्याण-डोंबिवलीवर पुन्हा ‘महायुती’चा भगवा फडकवा - उपमुख्यमंत्री शिंदे