प्रतिक्षा संपली! गव्हाण फाटा रेल्वे क्रॉसिंग पुल वाहतुकीसाठी खुला
कुटुंबासोबत राहा, दारु नव्हे छंद जोपासा -शाहीर नंदेश उमप
नवी मुंबई : थर्टीफर्स्ट म्हटले की दारु मस्ट... अे आजच्या समाजात जणू एक ठरलेले समीकरण बनत चालले आहे. विशेषत तरुणांमध्ये व्यसनांकडे झुकणारी प्रवृत्ती वाढत असल्याचे चिंताजनक चित्र समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर ‘अन्वय व्यसनमुक्ती केंद्र'च्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला वाशीतील ‘मराठी साहित्य संस्कृती-कला मंडळ'च्या सभागृहात जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी डॉ. अजित मगदूम यांनी प्रास्ताविकातून छुप्या जाहिराती आणि व्यसनग्रस्ततेची आकडेवारी मांडत चिंताजनक वास्तव स्पष्ट केले. सुरुवातीला ४ शाळकरी विद्यार्थ्यांनी नवीन वर्षाच्या स्वागताची वास्तववादी आणि अस्वस्थ करणारी मांडणी करत व्यसनाचे दुष्परिणाम सांगितले. सदर कार्यक्रमामध्ये विविध महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवला. रा. फ. नाईक कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्तीवरील प्रभावी पथनाट्य सादर करुन कार्यक्रमाची सुरुवात केली.
यावेळी लोकगीत गायक शाहीर नंदेश उमप, गॅलेक्सी परफॅक्टंटस् लि.चे सीएसआर प्रमुख कर्नल अमरजीत दास, प्रख्यात मानसोपचार तज्ञ डॉ. राकेश गिल्डियाल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी शाहीर नंदेश उमप यांनी गरीब वस्त्यांमध्ये व्यसनांचे प्रमाण जास्त का? असा प्रश्न उपस्थित करत गरीबांच्या हातात दगड न देता काम आणि पुस्तक द्या, माणसे जोडा, माणसे जिंका, असा प्रभावी संदेश दिला. तसेच नंदेश उमप यांनी काही प्रेरणादायी गीतांद्वारे वातावरणात ऊर्जा निर्माण केली आणि शेवटी महाराष्ट्र गीत सादर करत विद्यार्थ्यांमध्ये उत्साह निर्माण केला.
यावेळी डॉ. गिल्डियाल यांनी आपले मनोगत व्यक्त करताना एकदा प्रयोग म्हणून घेतलेला सिगारेट किंवा मद्याचा घोट पुढे गंभीर व्यसनात बदलतो. म्हणून असा प्रयोग करुच नका, असे विद्यार्थ्यांना आवाहन केले. तसेच शिस्त, खेळ, ट्रेकिंग, पोहणे यांसारख्या सकारात्मक छंदांमुळेच आरोग्य टिकते आणि व्यसनांपासून बचाव होतो असे कर्नल दास यांनी सांगितले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन वृषाली मगदूम यांनी केले. विविध संस्थांचे प्राचार्य, शिक्षक, तसेच ‘अन्वय'चे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जनजागृतीची दुसरी मोहीम...
‘अन्वय व्यसनमुक्ती केंद्र'च्या वतीने सायंकाळी वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात हॅण्डबिल्स वाटून वाहनचालक आणि नागरिकांना व्यसनविरोधी संदेश देण्यात आला. तसेच ज्यांना व्यसनातून बाहेर पडायचे आहे, अशांना उपचार केंद्रांची माहिती देण्यात आली. यामध्ये ‘अन्वय'च्या सर्व कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग घेतला.