सिडकोच्या २६ हजार घरांच्या किंमती कमी व्हाव्या यासाठी मनसेची पोस्ट कार्ड मोहीम
नवी मुंबई : ऑक्टोबर २०२४ मध्ये सिडकोने नवी मुंबई परिसरात २६ हजार घरांची लॉटरी जाहीर केली. जाहिरातीत ही घरे पंतप्रधान आवास योजने अंतर्गत सांगून घरांच्या किंमती सर्व सामन्यांच्या आवाक्या बाहेर ठेवल्या आहेत.
मनसे प्रवक्ते-शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या नेतृत्वाखाली या घरांच्या किंमती कमी व्हाव्या यासाठी मागील काही दिवसांपासून संघर्ष सुरू आहे. या संघर्षाचा पुढचा टप्पा म्हणून 28 पासून पोस्ट कार्ड मोहीम सुरू करण्यात आली आहे.
या मोहिमे अंतर्गत सिडको सोडतधारक मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री, मंत्री, आमदार, खासदार, सिडको वरिष्ठ अधिकारी यांना पोस्ट कार्ड पाठवून घरांच्या किंमती कमी करा म्हणून आवाहन करणार आहेत. या मोहिमेचा शुभारंभ वाशी पोस्ट ऑफिस मधून करण्यात आला. शेकडो सिडको सोडत धारकांनी एकत्र येऊन मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री, मंत्री, सिडको व्यवस्थापकीय संचालक यांना पत्र लिहून घरांच्या किंमती कमी कराव्या असे आवाहन केले. सिडको चे माजी अध्यक्ष संजय शिरसाट यांनी घरांच्या किंमती २० ते २० टक्क्यांनी कमी करू असे आश्वासन दिले होते याची आठवण ही सिडको सोडतधारक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना करून दिली.
५० ते ६० हजार पगार असणारे सोडत धारक ८५ लाखाचे घर कसे घेणार आणि त्यांना कोणती बँक कर्ज देणार अशी विचारणा ही सिडको व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांना करून दिली. तसेच ३२३ चौ फूट देऊन २९० चौ फुटाचे घर का दिले असा प्रश्न ही महिला सिडको सोडतधारक यांनी पत्राद्वारे उपस्थित केला.
राज्य सरकार व सिडकोने या मोहिमेची दखल घेऊन घरांचे दर कमी नाही केले तर ही मोहीम अजून तीव्र करणार तसेच पुढील आठवड्यात सिडको वर भव्य "इंजेक्शन मोर्चा" काढणार, असा इशारा सिडको सोडत धारकांनी या प्रसंगी दिला.
या मोहिमेत मनसे शहर सचिव विलास घोणे, सचिन कदम, शहर सह सचिव अभिजीत देसाई, वाशी विभाग अध्यक्ष सागर विचारे व मोठ्या संख्येने महिला, पुरुष सिडको सोडतधारक उपस्थित होते.