घणसोली सेंट्रल पार्क मधील जलतरण तलावाचे ‘शुक्लकाष्ट' कायम?

वाशी : नवी मुंबई महापालिका तर्फे दहा महिन्यांपूर्वी घणसोली मधील सेंट्रल पार्क परिसरात नवी मुंबई शहरातील नागरिकांना आरोग्यवर्धक व्यायामाची उत्तम संधी उपलब्ध करुन देण्यासाठी जलतरण तलाव सुरु करण्यात आला आहे. मात्र, अल्पावधीतच या जलतरण तलावाची स्थिती बिघडू लागली असून, सध्या या जलतरण तलावाची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याने सेंट्रल पार्क मधील जलतरण तलावातील समस्यांची तात्काळ सोडवणूक करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अभिजित पाटील यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.

महापालिकेने लाखो रुपये खर्चून उभारलेल्या सेंट्रल पार्क मधील जलतरण तलावामुळे जलक्रीडा प्रेमी, व्यावसायिक जलतरणपटू आणि मुले-मुलींना पोहण्याचे प्रशिक्षण घेण्यासाठी मोठी सोय झाली होती. मात्र, महापालिकेने देखभाल आणि दुरुस्ती वेळेवर न केल्याने जलतरण तलाव सुविधा अपघाताचे केंद्र बनू लागले आहे. जलतरण तलावातील हॅलोजन लाईट सतत बंद राहणे आता नित्याची बाब झाली आहे. यापेक्षाही गंभीर म्हणजे संबंधित कंत्राटदाराने हॅलोजन लाईट तलावाच्या उलट्या दिशेला लावल्यामुळे प्रकाशयोजनेत मोठी अडचण निर्माण झाली आहे. परिणामी, विशेषतः संध्याकाळी पोहणाऱ्या नागरिकांना अंधारातच सराव करावा लागत आहे.या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते अभिजित पाटील यांनी महापालिका विद्युत उप अभियंता संतोष मोरास्कर यांच्याशी पाच दिवसांपूर्वी  संपर्क साधला होता. त्यावेळी त्यांनी तातडीने विद्युत समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नसल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. महापालिका अधिकाऱ्यांकडून कंत्राटदारावर कारवाई होत नसल्याने त्यांच्या संगनमताबाबतही नागरिकांमध्ये कुजबुज सुरु आहे.

जलतरण तलाव परिसरात लहान-मोठे अपघात वारंवार घडत असल्याचेही समोर आले आहे. हॅलोजनचा हुक खराब झाल्यामुळे तो उलट्या दिशेला लटकत असल्याने कोणत्याही क्षणी मोठा अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यामुळे महिला वापरकर्त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न अधिकच गंभीर बनला आहे.

दरम्यान, मागील दोन महिन्यांत जलतरण तलाव दोन वेळा बंद ठेवण्यात आला होता. ७ फेब्रुवारी ते १४ फेब्रुवारी या कालावधीत पूलच्या टाकीला गळती लागल्यामुळे जलतरण तलाव बंद होता. त्यानंतर ९ मार्च ते १४ मार्च या कालावधीत पाणी शुध्दीकरण यंत्रणा निकामी होऊन पाणी दूषित झाल्याने पुन्हा जलतरण तलाव बंद ठेवावा लागला होता. मात्र, या सर्व दुरुस्तीनंतरही जलतरण तलावातील समस्या कायम असल्याने महापालिका प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

घणसोली येथील सेंट्रल पार्क मधील जलतरण तलावात वारंवार उद्‌भवणाऱ्या समस्या, सुरक्षेचा वाढता धोका आणि प्रशासनाची उदासीनता यामुळे स्थानिक नागरिक संतप्त झाले असून, आवश्यक ती उपाययोजना न झाल्यास महापालिका विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात  येणार आहे. - अभिजित आबासाहेब पाटील, सामाजिक कार्यकर्ते -घणसोली, नवी मुंबई.  

घणसोली येथील सेंट्रल पार्क मधील जलतरण तलावातील विद्युत उपकरणांबाबत प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने जलतरण तलावातील विद्युत उपकरणांच्या दुरुस्तीचे काम तात्काळ सुरु करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. - संतोष मोरास्कर, उप अभियंता (विद्युत) - नवी मुंबई महापालिका. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

कचरा प्रक्रिया प्रकल्पातील दुर्गंधीमुळे शेलारपाडा ग्रामस्थ हैराण