‘नवी मुंबई'चा पुन्हा राष्ट्रीय गौरव
नवी मुंबई : मालमत्ता कर व्यवस्थेमध्ये नवी मुंबई महापालिकेने राबविलेल्या व्यापक सुधारणा आणि नागरिक-केंद्रित डिजिटल प्रशासन उपक्रमासाठी देशातील प्रतिष्ठेचा ‘स्कॉच पुरस्कार-२०२५' नवी दिल्ली येथे १०४ व्या स्कॉच शिखर परिषदेत महापालिकेला प्रदान करण्यात आला. महापालिकेच्या वतीने सदर पुरस्कार अतिरिक्त आयुक्त सुनील पवार आणि मालमत्ता कर विभागाचे उपायुक्त डॉ. अमोल पालवे यांनी ‘स्कॉच डेव्हलपमेंट फाऊंडेशन'चे अध्यक्ष समीर कोच्छर यांच्या हस्ते स्विकारला. नवी मुंबई महापालिकेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांचा सदर देशपातळीवर दखल घेत झालेला गौरव आहे.
करभरणा करून शहर विकासात हातभार लावणा-या नागरिकांचे
आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी केले अभिनंदन आणि मानले आभार !
नवी मुंबई महापालिकेला लाभलेला राष्ट्रीय प्रतिष्ठेचा ‘स्कॉच पुरस्कार' नमुंमपा अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांच्या सामुहिक प्रयत्नांचे फलित आहे. या माध्यमातून सुशासन, पारदर्शकता, तंत्रज्ञानाधारित करप्रणाली आणि उत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापन या निकषांवर महापालिकेच्या उल्लेखनीय कामाची राष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने मालमत्ता कर सुधारणा उपक्रमाचा उल्लेख करावा लागेल. सदर प्रकल्प म्हणजे केवळ तांत्रिक बदल नसून नागरिकांचा विश्वास निर्माण करणारा आणि शहराच्या आर्थिक सक्षमीकरणाचा मजबूत पाया आहे. त्यामुळे करभरणा करून शहर विकासात हातभार लावणाऱ्या नागरिकांचे सर्वात मोठे योगदान असल्याबद्दल आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी आभार व्यक्त केले आहेत.
‘नमुंमपा'ने पूर्वीच्या हस्तलिखित, त्रुटीपूर्ण आणि अर्धवार्षिक कर आकारणी प्रणालीऐवजी पूर्णतः नव्याने सूत्रबध्द आणि सुनियोजित रचना केलेली मालमत्ता कर प्रणाली अंमलात आणली. या प्रणाली अंतर्गत एकच निश्चित वार्षिक करबिल, शासकीय दरांवर आधारित स्वयंचलित करआकारणी, पारदर्शक आणि न्याय्य मूल्यांकन, नागरिकांना समजेल अशी सोपी कररचना यांची अंमलबजावणी करण्यात आली.
मालमत्ता कर प्रणालीतील सुधारणांमध्ये सर्वसमावेशकतेला विशेष प्राधान्य देण्यात आले. नागरिकांसाठी एकाच वेळी ऑफलाईन आणि ऑनलाईन विविध माध्यमांतून कर भरण्याची सुविधा, क्यूआर कोडद्वारे सुलभ कर भरणा सुविधा देण्यात आली. विविध प्रकारच्या करभरणा सेवा, जनजागृती मोहिमा आणि माहिती आधारित थकबाकी वसूली मोहिम राबविण्यात आली. त्यामुळे कर भरण्याबाबत नागरिकांचा विश्वास वाढून स्वयंस्फूर्त सहभाग लक्षणीयरित्या वाढला.
मालमत्तांची अचूक ओळख सुनिश्चित करण्यासाठी मालमत्तांचे भौगोलिक स्थान नोंदविणे, पत्त्यांची पडताळणी आणि अद्ययावत नोंद, संपर्क क्रमांकांची खात्री, उच्च करक्षमतेच्या मालमत्तांवर लक्ष केंद्रित कारवाई करण्यात आली. यामुळे करआकारणी आणि संकलनात अचूकता आणि पारदर्शकता वाढली.
दरम्यान, मालमत्ता कर भरणा प्रक्रियेत राबविलेल्या विविधांगी व्यापक सुधारणा आणि नागरिक-केंद्रित डिजिटल प्रशासन उपक्रमांसाठी नवी मुंबई महापालिकेला देशातील प्रतिष्ठेचा ‘स्कॉच पुरस्कार २०२५- सिल्व्हर' प्रदान करुन गौरविण्यात आले असून याद्वारे ‘नमुंमपा'च्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला.