प्रतिक्षा संपली! गव्हाण फाटा रेल्वे क्रॉसिंग पुल वाहतुकीसाठी खुला
आनंदनगर एमआयडीसीत ना. उदय सामंत यांची भेट
अंबरनाथ : अंबरनाथ येथील आनंदनगर एमआयडीसीमधील श्री गणेश केमिकल कंपनीला लागलेल्या भीषण आगीच्या घटनेची गंभीर दखल घेत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी ११ मार्च रोजी रात्री उशिरा या परिसराची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी श्रीराम केमिकल कंपनीला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.
या दौऱ्यात ना. सामंत यांच्यासोबत ‘अंबरनाथ'च्या नगराध्यक्षा तेजश्री करंजुले, आमदार डॉ. बालाजी किणीकर आणि माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी यांच्यासह इतर लोकप्रतिनिधी उपस्थित होते. पाहणीवेळी सुनील चौधरी यांनी ‘एमआयडीसी'मधील एकूण कंपन्यांचे ऑडिट रेकॉर्ड, सुरक्षेच्या दृष्टीने केलेली उपाययोजना आणि ‘प्रदुषण नियंत्रण मंडळ'ने दोषींवर आजवर केलेली कारवाई याचा सविस्तर अहवाल सादर करण्याची मागणी केली. यावर तात्काळ पावले उचलत, एमआयडीसी परिसरातील सर्व केमिकल कंपन्यांचे फायर आणि सेपटी ऑडिट झाले आहे की नाही, याचा सविस्तर अहवाल येत्या ८ दिवसांत सादर करण्याचे निर्देश ना. उदय सामंत यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
पाहणी दरम्यान काही अधिकाऱ्यांना आपल्या कार्यक्षेत्रातील कंपन्यांबाबत पुरेशी माहिती नसल्याचे समोर येताच ना. उदय सामंत यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. अधिकाऱ्यांना आपल्या क्षेत्रातील उद्योगांची माहिती नसणे शोकांतिका असल्याचे सांगत त्यांनी प्रशासनाला अधिक सजग राहण्याच्या सूचना दिल्या.
दरम्यान, ९ मार्च रोजी लागलेल्या भीषण आगीत श्री गणेश केमिकलसह शेजारील मिरॅकल आणि आय क्लाऊड ९ या कंपन्यांचे मोठे नुकसान झाले होते. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी, या घटनेमुळे औद्योगिक सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
केमिकल उद्योगांमुळे मानवी वस्तीला धोका निर्माण होऊ नये, अशी शासनाची प्राथमिकता आहे. जर कोणत्याही उद्योगाकडून नियमांचे उल्लंघन होत असेल तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. विशेषतः इन्शुरन्स मिळवण्यासाठी जाणूनबुजून आगीच्या घटना घडवल्या जात असल्याचे संशय असल्यास त्याचीही सखोल चौकशी करुन कारवाई केली जाईल.
-ना. उदय सामंत, उद्योगमंत्री-महाराष्ट्र.