५.५ कोटीचे चरस जप्त; १ जेरबंद

ठाणे : पश्चिम बंगाल मधील रहिवासी शनवर अन्वर अली (वय-३८) याला वागळे इस्टेट गुन्हे शाखेने अटक केली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून ५ कोटी ५० लाख रुपये किंमतीचे चरस जप्त केले आहे. चौकशी दरम्यान अली याने सदर चरस नेपाळी व्यक्तीकडून मिळवले होते,  अशी कबुली दिली आहे. अली विरुध्द कापूरबावडी पोलीस ठाणे मध्ये बेकायदेशीरपणे अंमली पदार्थ बाळगल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे पोलिसांनी सांगितले.

वागळे इस्टेट गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सलील भोसले यांना २१ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास ठाणे मधील साकेत रोड आणि बाळकुम पाडा क्रमांक-२ दरम्यानच्या परिसरात चरस विक्रीसाठी अली येणार असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीवरुन कारवाई करत सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण शिंदे आणि जगदीश गावित यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सापळा रचला. खबऱ्याच्या इशाऱ्यावरुन पोलिसांनी अली याला घटनास्थळी अटक केली. अली याच्या बॅगेची झडती घेतली असता पोलिसांना एकूण ५०५ ग्रॅम वजनाचे दहा पाकिटे चरस आणि काही कपडे आढळले. आंतरराष्ट्रीय बाजारात चरसच्या प्रत्येक पॅकेटची किंमत ५० लाख ५० हजार रुपये आहे. त्यामुळे जप्त केलेल्या अमली पदार्थांची एकूण किंमत ५ कोटी ५० लाख रुपये झाली आहे. याशिवाय, ५,५६५ रुपये रोख आणि एक मोबाईल फोन देखील जप्त करण्यात आला आहे.

अली मूळचा पश्चिम बंगाल मधील रहिवासी असून, तक्रारीत त्याचा साथीदार नेपाळी नागरिक असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्याच्यावर एनडीपीएस कायदा, १९८५ मधील कलम ८(क), २०(ब),(क) आणि २९ अंतर्गत अंमली पदार्थ बेकायदेशीरपणे बाळगल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

ठाणे खंडणी विरोधी पथकाद्वारे मेफेड्रोन विक्री रॅकेट उध्वस्त