डीपीएस फ्लेमिंगो तलावात शेवाळ सफाई सुरु

नवी मुंबई : नेरुळ येथील डीपीएस पलेमिंगो तलावात ‘मँग्रोव्ह सेल'ने अतिरिक्त शेवाळ काढण्याचे काम सुरू केले असले, तरी तलावाच्या दक्षिण टोकावरील मुख्य ज्वारीय जलवाहिनी अनेक वर्षांपासून बुजवलेली असल्याने सदरची सफाई अपुरी ठरु शकते, अशी चिंता पर्यावरणवाद्यांनी व्यक्त केली आहे.

डीपीएस तलावातील जलवाहिनी बुजवल्यामुळे नैसर्गिक पाण्याचा प्रवाह खंडीत झाला असून त्यामुळे पाणी साचणे आणि शैवाल वाढीस चालना मिळाल्याचे पर्यावरणवाद्यांचे म्हणणे आहे. डीपीएस पलेमिंगो तलाव ठाणे खाडी पलेमिंगो अभयारण्याशी जोडलेला महत्त्वाचा पूरक जलस्त्रोत असून, येथे पलेमिंगो पक्ष्यांना खाद्य आणि विश्रांतीसाठी पर्यायी अधिवास मिळतो. अशा जलस्त्रोतांचे आरोग्य बिघडल्यास संपूर्ण किनारी परिसंस्थेवर परिणाम होतो, असे पर्यावरणतज्ञ सांगतात.

‘नॅटकनेक्ट फाऊंडेशन'चे संचालक बी. एन. कुमार यांनी सफाईचे स्वागत करताना ती केवळ तात्पुरती उपाययोजना ठरु नये, असे म्हटले आहे. पाण्याची गुणवत्ता, अन्नसाखळी आणि ज्वारीय प्रवाह बिघडल्यास पलेमिंगो त्वरित परिसर सोडतात, असे त्यांनी सांगितले. यंदा काही पलेमिंगो पक्षी केवळ पाहणीसाठी आले आणि लगेच परत गेले, हेच तलावाच्या खराब स्थितीचे संकेत असल्याचे कुमार म्हणाले.

गेल्या काही आठवड्यात तलावाचा मोठा भाग दाट शेवाळाने झाकला गेला होता. त्यामुळे मोकळे पाण्याचे क्षेत्र कमी झाले आणि विरघळलेल्या प्राणवायूचे प्रमाण घटण्याची भिती निर्माण झाली. जागतिक अभ्यासानुसार अशा स्थितीत पलेमिंगो मृत्यू किंवा स्थलांतर टाळण्याचे प्रकार घडले आहेत, असे पर्यावरणवाद्यांनी नमूद केले.

‘सेव्ह पलेमिंगोज अँड मॅन्ग्रोव्हज फोरम'च्या रेखा शंखला आणि कुमार यांनी ‘सिडको'वर तीव्र टीका करत प्रवासी जलवाहतूक टर्मिनलच्या प्रवेश रस्त्यासाठी तलावाची मुख्य जलवाहिनी बुजवली गेल्याचा आरोप केला. त्यामुळे तलावाची नैसर्गिक नाडी बंद झाली असून, त्याचे गंभीर परिणाम दिसत असल्याचे त्यांनी सांगितले. सर्व बंद असलेले ज्वारीय पाण्याचे मार्ग तातडीने खुले करण्याची गरजही त्यांनी बोलून दाखवली.

गेल्या वर्षी याच तलावात पलेमिंगो पक्ष्यांचा मृत्यू झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर जनआक्रोश झाला होता. त्यानंतर डीपीएस पलेमिंगो तलावाला संवर्धन राखीव क्षेत्राचा दर्जा देण्यात आला. मात्र, त्यासंबंधीचा औपचारिक शासन आदेश अद्याप प्रलंबित आहे.

‘नवी मुंबई पर्यावरण संरक्षण संस्था'चे संदीप सरीन यांनी सांगितले की, डीपीएससारखे तलाव पलेमिंगोंचे ‘दुसरे घर' आहेत. सदर जलस्त्रोत दुर्लक्षित राहिल्यास जैवविविधतेवर गंभीर परिणाम होतो. एकंदरीतच तलावाची दीर्घकालीन पुनर्बांधणी ज्वारीय प्रवाह पुनर्स्थापित करणे, सातत्यपूर्ण देखभाल आणि वन विभागाकडे व्यवस्थापन सोपवण्यावर अवलंबून आहे, असे पर्यावरणवाद्यांनी स्पष्ट केले आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

खासगी शस्त्र परवानाधारकांनो, आता पोलिसांच्या हायटेक' रेंजमध्ये करा गोळीबाराचा सराव !