प्रतिक्षा संपली! गव्हाण फाटा रेल्वे क्रॉसिंग पुल वाहतुकीसाठी खुला
‘उरण' उपनगराध्यक्षपदी ‘भाजपा'चे रवी भोईर बिनविरोध
उरण : ‘उरण नगरपरिषद'च्या उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक पिठासीन अधिकारी नगराध्यक्षा भावना घाणेकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी उपनगराध्यक्ष पदी ‘भाजपा'चे रवी भोईर यांची बिनविरोध निवड करण्यात आली असून त्यांचे नगराध्यक्षा भावना घाणेकर यांनी सर्वप्रथम अभिनंदन केले.
रवी भोईर यांची उपनगराध्यक्ष पदी निवड होताच ‘भाजपा'चे जेष्ठ नेते माजी खासदार रामशेठ ठाकूर, जे. एम. म्हात्रे, आमदार महेश बालदी, आमदार प्रशांत ठाकूर, भाजपा जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.
‘उरण नगरपरिषद'च्या २१ डिसेंबर रोजी झालेल्या निवडणुकीच्या निकालात ‘महाविकास आघाडी'च्या भावना घाणेकर या नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्या. तसेच या निवडणुकीत ‘महाविकास आघाडी'चे ९ नगरसेवक तर ‘भाजपा'चे १२ नगरसेवक निवडून आले. भावना घाणेकर नगराध्यक्ष पदी विराजमान झाल्यानंतर १४ जानेवारी रोजी मकरसंक्रांतीच्या शुभमुहूर्तावर उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीसाठी ‘भाजपा'चे रवी भोईर यांचा एकच अर्ज आल्याने त्यांची उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. यानंतर ‘भाजपा'च्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.
‘उरण नगरपरिषद'चे मुख्याधिकारी समीर जाधव, भाजपा जिल्हा सरचिटणीस चंद्रकांत घरत, महिला पदाधिकारी सीमाताई घरत, तालुका अध्यक्ष धनेश गावंड, माजी सरपंच जितेंद्र घरत, तालुका सरचिटणीस समीर मढवी, भाजपा शहराध्यक्ष कौशिक शहा यांच्यासह ‘भाजपा'चे नवनिर्वाचित नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष रवी भोईर यांना शुभेच्छा दिल्या. यानंतर ‘भाजपा'च्या वतीने रवी भोईर यांची विजयी मिरवणूक काढण्यात आली.