‘कोणाही व्यक्तीचं व्यसन सुटू शकतं'
नवी मुंबई : दवा, समुपदेशन, नशा मुक्ती केंद्र तसेच मद्यपी अनामिक (AA) या चार बाबींची मदत घेऊन कोणाही व्यक्तीचं व्यसन सुटू शकतं असा विश्वास सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ञ डॉक्टर धरव शाह यांनी समुपदेशकांमध्ये निर्माण केला. अन्वय प्रतिष्ठान आणि स्त्री मुक्ती संघटना यांच्या विद्यमाने पार पडलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. ५० हून अधिक कार्यकर्त्यांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेतला.
डॉक्टर धरव शाह यांनी समुपदेशन प्रचार प्रसार करणाऱ्यांना प्रत्यक्ष संवाद, पीपीटी सादरीकरण आणि रोल प्ले द्वारे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश समुपदेशकांच्या कौशल्यात वृद्धी करणे असा असला तरी समुपदेशन कौशल्यातील नवे आयाम त्यांनी उघडून दाखवले. विशेष म्हणजे व्यसनमुक्ती कार्यात येणाऱ्या अडचणी, शंका यावर मार्गदर्शन केले. व्यसनमुक्त झाल्यानंतर व्यसन पुन्हा लागू नये यासाठी आवश्यक कौशल्ये आणि त्याचे व्यवस्थापन (Lapse Prevention Management) यावर त्यांनी भर दिला. Motivational Interviewing ही नवीन संकल्पना त्यांनी समजावून सांगितली. व्यसनींना नियमित जेवण, झोप, छंद, नवीन मित्र, व्यायाम, ध्यान याप्रकारे जीवनशैलीत बदल करून त्यांचे जीवन संतुलित कसे करता येईल हे विषद केले. यात यात व्यसनी व्यक्तीच्या कुटुंबाचं समुपदेशन हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. घरातल्या लोकांची व्यसनी व्यक्तीशी कशाप्रकारे वागणूक असावी, बोलणे असावेत याबद्दल त्यांनी महत्वाच्या टिप्स दिल्या. कार्यक्रमाची सुरुवात स्त्री मुक्ती संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या चळवळीच्या गाण्याने झाली. अन्वय व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक डॉ अजित मगदूम प्रास्ताविक आणि पाहुण्यांचा परिचय करून दिला. सदर कार्यक्रमात स्त्रीमुक्ती संघटनेचे वस्ती पातळीवर काम करणाऱ्या कार्यकर्त्या, समुपदेशक, अन्वयचे समुपदेशक, सपोर्ट व्यसनमुक्ती केंद्राचे कार्यकर्ते तसेच अन्य अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. अनिल लाड, चंद्रकांत सर्वगोड यांच्या हस्ते प्रमाणपत्रे देण्यात आली. रश्मी कार्ले यांनी उपस्थितांचे आभार मानले.