म्हाडा निर्णयाच्या धर्तीवर सिडकोनेही घरांच्या किंमती कमी करण्याचा निर्णय घ्यावा
‘कुळगांव-बदलापूर नगरपरिषद' ॲक्शन मोडवर
बदलापूर : कुळगाव-बदलापूर नगरपरिषद हद्दीतून १०० टक्के मालमत्ता कर वसूल करण्याबाबत मुख्याधिकारी मारुती गायकवाड कर विभागाला आदेश दिले आहेत. त्यानुसार ‘कुळगांव-बदलापूर नगरपरिषद'च्या वतीने थकीत मालमत्ता धारकांविरोधात धडक कारवाई सुरु करण्यात आली आहे. याअंतर्गत ‘नगरपरिषद'च्या भरारी पथकांनी ५२ मालमत्ता जप्त केल्या असून त्यांच्याकडे ६४,१४,८९३ रुपये इतका मालमत्ता कर थकीत आहे.
कुळगांव-बदलापूर नगरपरिषद हद्दीत साधारणपणे १,४०,००० मालमत्ता धारक आहेत. ‘नगरपरिषद'चे सन २०२४-२५ या आर्थिक वर्षातील मालमत्ता कराचे उद्दिष्ट एकूण ८१.८४ कोटी रुपये इतके आहे. त्यापैकी ‘नगरपरिषद'ने जवळपास ५७.५९ कोटी रुपये इतकी वसुली केली आहे. अजूनही २४.२५ कोटी इतकी मालमत्ता कराची थकबाकी ‘नगरपरिषद'ला येणे बाकी आहे. त्यामुळे सदर थकीत मालमत्ता कर वसूल करण्यासाठी ‘नगरपरिषद'च्या मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांच्या आदेशाने १० ते १७ मार्च २०२५ या कालावधीत विशेष वसुली मोहीम हाती घेतली आहे.
सदर मोहिमे करिता ‘नगरपरिषद'मार्फत ५ भरारी पथके गठीत करण्यात आली आहेत. या पथकांमार्फत थकीत मालमत्ता कर धारकांच्या मालमत्ता जप्त करणे किवा अटकावणी करण्याची कारवाई करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने १० मार्च रोजी भरारी पथकांनी ६४.१५ लाखांची कर थकबाकी असलेल्या ५२ मालमत्तांवर जप्ती कारवाई केली. भरारी पथकांनी आत्तापर्यंत जवळपास ३६.५१ लाख रुपये इतकी वसुली केली आहे.
कुळगाव-बदलापूर नगरपरिषद हद्दीतील ज्या मालमत्ता धारकाचा मालमत्ता कर थकीत आहे, त्यांनी लवकरात लवकर आपला थकीत मालमत्ता कर जमा करुन ‘नगरपरिषद'ला सहकार्य करुन जप्तीची कटू कारवाई टाळावी, असे आवाहन करण्यात येत आहे.
-मारुती गायकवाड, मुख्याधिकारी-कुळगांव बदलापूर नगरपरिषद.