मार्टिन गॅरिक्सच्या इव्हेन्टनंतर त्वरित स्वच्छता मोहीम

नवी मुंबई : नेरुळ येथील डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये जगप्रसिध्द संगीतकार आणि डीजे मार्टिन गॅरिक्स यांच्या कार्यक्रमाचे आयोजन होळी सणानिमित्त करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी देशभरातून हजारो नागरिक नवी मुंबईत येण्याची शक्यता लक्षात घेऊन वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांनी परिसरातील रस्यांवरील वाहतूक बदल करीत नियोजन केले होते.

नवी मुंबई महापालिकेने देखील सदर कार्यक्रमास हजाराेंच्या संख्येने संगीत रसिक उपस्थित राहणार असल्याने आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली घनकचरा संकलन आणि वाहतुकीचे नियोजन केले होते.

जानेवारी महिन्यात याच स्टेडियममध्ये झालेल्या ‘कोल्ड प्ले' या आंतरराष्ट्रीय लोकप्रिय संगीतमय कार्यक्रमाच्या वेळी घनकचऱ्याचे सुयोग्य नियोजन करण्यात आले होते. त्यामुळे अगदी पहाटेपर्यंत कचरा संकलन आणि वाहतूक करून शहर स्वच्छतेवर कोणताही परिणाम होऊ न दिल्याने महारपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनाची प्रशंसा नागरिकांप्रमाणेच राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली होती.

त्याच धर्तीवर आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांच्या नियंत्रणाखाली घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ.अजय गडदे आणि सहा. आयुक्त सागर मोरे यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून स्वच्छता प्रक्रियेला गती दिली. परिमंडळ-१ चे उपायुक्त सोमनाथ पोटरे आणि नेरुळ विभागाचे सहा. आयुक्त जयंत जावडेकर यांनीही याकामी योगदान दिले.

नेेरुळ विभागाचे स्वच्छता अधिकारी अरुण पाटील आणि स्वच्छता निरीक्षक मिलिंद आंबेकर, नवनाथ ठोंबरे, भूषण सुतार यांच्यासमवेत  घनकचरा व्यवस्थापन विभागाचे सर्व पर्यवेक्षक, स्वच्छतादूत तसेच कचरा वाहतूक पर्यवेक्षक, व्यवस्थापक आणि सर्व स्वच्छता दूत यांनी सफाई कामाला गती देत रात्रीच पहाटेपर्यंत जलद स्वच्छता केली.

दरम्यान, घनकचरा व्यवस्थापन विभाग अशा प्रकारच्या विविध कार्यक्रमांचे मोठे स्वरुप लक्षात घेऊन साफसफाईचे नियोजन करीत असल्याने नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

होळी-धुळवडीत १७२ नशेबाज वाहतूक पोलिसांच्या जाळ्यात