प्रतिक्षा संपली! गव्हाण फाटा रेल्वे क्रॉसिंग पुल वाहतुकीसाठी खुला
लोकशाहीच्या बळकटीकरणात मतदारांचा सहभाग महत्त्वाचा -जिल्हाधिकारी जावळे
अलिबाग : लोकशाही बळकटीकरणात मतदारांचा सहभाग महत्त्वाचा असून मतदारांनी मतदानाचा अधिकार बजावणे आवश्यक आहे. नवमतदारांनी अन्य युवकांना तसेच दिव्यांग व्यक्तींना मतदार नोंदणी आणि मतदानासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले.
रायगड जिल्हाधिकारी कार्यालयात १६ व्या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात जावळे बोलत होते. सदर कार्यक्रमाला उपजिल्हा निवडणूक अधिकारी नितीन वाघमारे, उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण, तहसीलदार विक्रम पाटील, जे.एस.एम. कॉलेजच्या प्राचार्य सोनाली पाटील, ‘महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी संघटना'चे अध्यक्ष दिव्यांग आयकॉन साईनाथ पवार, युथ आयकॉन तपस्वी गोंधळी आदि उपस्थित होते.
लोकशाही बळकट करण्यासाठी योगदान देणाऱ्या पुरस्कारार्थ्यांचे अभिनंदन करुन जिल्हाधिकारी म्हणाले, मतदार यादी मतदान प्रक्रियेचा आत्मा असून मतदान प्रक्रिया लोकशाहीचा आत्मा आहे. नवमतदारांना मतदान प्रक्रियेत सहभागी करुन घ्यावे, त्यांची मतदार म्हणून नोंदणी व्हावी, असा राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यामागील उद्देश आहे. मतदार यादी सर्वसमावेशक व्हावी यासाठी जिल्हा निवडणूक प्रशासनाने विशेष प्रयत्न केले. महिला, दिव्यांग, आदिवासी, कामगार आणि दुर्गम भागातील नागरिकांच्या मतदार नोंदणीसाठी विशेष प्रयत्न करण्यात आले. युवकांची नोंदणी करुन त्यांचा मतदान प्रक्रियेमध्ये सहभाग वाढावा यासाठी प्रबोधन करणे आवश्यक आहे. ज्या नवमतदार यांनी मताधिकार बजावला आहे, त्यांनी जनजागृती करावी. तसेच मतदार नोंदणीसाठी युवक-युवतींनी प्रोत्साहित करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जावळे यांनी यावेळी केले.
प्रास्ताविक करताना उपजिल्हा निवडणूक अधिकारी नितीन वाघमारे यांनी मतदार दिन कार्यक्रमाची माहिती दिली. ‘भारत निवडणूक आयोग'ची स्थापना २५ जानेवारी १९५० रोजी झाल्याने २०११ पासून मतदार जागृतीसाठी सदरचा दिवस साजरा केला जात असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा प्रशासनातर्फे आयोजित विविध उपक्रमांची माहितीही त्यांनी दिली.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन तहसिलदार विक्रम पाटील यांनी मानले.
उत्कृष्ट कामगिरीबद्दल सत्कार...
जिल्हाधिकारी यांच्या हस्ते उत्कृष्ट मतदार नोंदणी अधिकारी प्रविण पवार, उत्कृष्ट वृत्तपत्र दैनिक रायगड टाईम्सचे संपादक राजन वेलकर, उत्कृष्ट समन्वय अधिकारी, य अधिकारी मतदान यंत्र व्यवस्थापन, टपाली मतदान व मतमोजणी, समन्वय अधिकारी निवडणूक खर्च नियंत्रण समिती तसेच इतर विभागातील मतदार नोंदणी अधिकारी, सहायक मतदार नोंदणी अधिकारी, निवडणूक नायब तहसिलदार, महसूल सहायक अधिकारी, महसूल सहायक, शिपाई, डाटा एंन्ट्री ऑपरेटर, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, महाविद्यालय या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले.