ढोल-ताशांच्या गजरात तेजश्री करंजुले यांचा पदग्रहण सोहळा

अंबरनाथ : ‘अंबरनाथ नगरपरिषद'च्या सार्वत्रिक निवडणुकीत ६५०० हून अधिक मताधिक्याने ऐतिहासिक विजय मिळवणाऱ्या ‘भाजपा'च्या नवनिव्रााचित नगराध्यक्षा तेजश्री विश्वजीत करंजुले यांनी २ जानेवारी रोजी अधिकृतपणे आपला पदभार स्वीकारला. ढोल-ताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी आणि कार्यकर्त्यांच्या अलोट उत्साहात सदर दिमाखदार सोहळा पार पडला. या सोहळ्याने शहरात एका नव्या राजकीय पर्वाची नांदी दिल्याचे पाहायला मिळत आहे.

२ जानेवारी रोजी सकाळी ‘अंबरनाथ नगरपरिषद' कार्यालयासमोर झालेल्या या सोहळ्याला ‘भाजपा महिला मोर्चार्'च्या प्रदेशाध्यक्षा आमदार चित्रा वाघ, आमदार किसनराव कथोरे, भाजप प्रदेश महामंत्री माधवी नाईक, आमदार कुमार आयलानी यांच्यासह ‘काँग्रेस'चे शहराध्यक्ष प्रदीप पाटील आणि ‘राष्ट्रवादी काँग्रेस'चे (अजित पवार गट) शहराध्यक्ष सदाशिव हैदर पाटील यांची उपस्थिती लक्षवेधी ठरली. विविध पक्षीय नेत्यांच्या उपस्थितीमुळे शहरात नव्या सत्तासमीकरणांचे संकेत मिळत असून, ‘अंबरनाथ विकास आघाडी'च्या घोषणेने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. माजी नगराध्यक्ष गुलाबराव करंजुले, विश्वजीत करंजुले आणि अभिजीत करंजुले यांच्यासह शहरातील प्रतिष्ठित नागरिक या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार झाले.

पदभार स्वीकारल्यानंतर नागरिकांना संबोधित करताना तेजश्री करंजुले यांनी आपल्या आगामी कार्यकाळाचा रोडमॅप स्पष्ट केला. भ्रष्टाचारमुक्त आणि भयमुक्त अंबरनाथ असे आपले सर्वोच्च ध्येय असल्याचे त्यांनी ठामपणे नमूद केले. वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवून महिला आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस प्रशासनाशी समन्वय साधून काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

शहरातील जटील बनलेल्या वाहतूक कोंडीच्या प्रश्नावर त्यांनी ठोस उपाययोजनांची घोषणा केली. वन-वे व्यवस्था, सुसूत्र नियोजन आणि मल्टी लेव्हल पार्किंग' सुविधेच्या माध्यमातून नागरिकांचा दैनंदिन त्रास कमी करण्याला आपले प्राधान्य असेल, असे त्या म्हणाल्या. तसेच प्रलंबित विकासकामांचा दर्जा राखण्यासाठी ठेकेदारांना कडक इशारा देत, कामात कुचराई करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे संकेतही त्यांनी दिले. ‘अंबरनाथ नगरपरिषद'च्या १९ शाळांचा दर्जा उंचावून तिथे विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढवण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला. विशेष म्हणजे, नगरपालिकेचा कारभार पारदर्शक आणि गतिमान करण्यासाठी स्वतंत्र अधिकृत वेबसाईट सुरु करण्याची घोषणा त्यांनी केली. यामुळे करभरणा आणि तक्रार निवारण यासारख्या सेवा ऑनलाइन उपलब्ध होऊन नागरिकांना नगरपालिकेत चकरा मारण्यापासून सुटका मिळेल.

सत्ताधारी आणि विरोधक असा भेदभाव न करता जनहितासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ‘अंबरनाथ'चा कायापालट करण्याचा संकल्प केला आहे. एकंदरीतच जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ न देता शहराचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी आपण कटीबध्द आहोत.
-तेजश्री करंजुल, नगराध्यक्षा-अंबरनाथ नगरपरिषद. 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

अंबरनाथ मधील वाढत्या गुन्हेगारीविरोधात नगराध्यक्षा ॲक्शन मोडवर