म्हाडा निर्णयाच्या धर्तीवर सिडकोनेही घरांच्या किंमती कमी करण्याचा निर्णय घ्यावा
डोंबिवली एसटी स्टॅन्डची सुरक्षा रामभरोसे
डोंबिवली : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन कल्याण डेपो अंतर्गत डोंबिवली एमआयडीसी येथील एसटी स्थानकात सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्याने सरकार याकडे लक्ष देईल का? दिवसा सुरक्षा रक्षक नसल्याने याठिकाणी पोलीस चौकी असावी, अशी मागणी जोर धरु लागली आहे.
सदर एसटी स्टॅन्डची स्थानिक पोलिसांनी पाहणी करुन ज्या ठिकाणी सीसीटिव्ही कॅमेरा लावण्याची गरज आहे, तिकडे लावावे असे सांगण्यात आले.
या एसटी स्टॅन्डमधून डोंबिवलीकर प्रवास करत असतात. मात्र, या एसटी स्टॅन्डमध्ये सुरक्षाच नसल्याचे दिसते. रात्र पाळीवर एक सुरक्षरक्षक तैनात असतो, तोही नावापुरताच असल्याचे नागरिकांनी सांगितले. कल्याण आणि वि्लवाडी आगारातून एसटी येत असते. या स्टॅन्डमध्ये पिण्याची सोय नसल्याने प्रवाशी वर्ग पुरते वैतागले आहेत. तिकीट काढण्याकरिता २ कर्मचारी असतात. स्टॅन्डचा परिसर मोठा असल्याने नागरिकांची सतत वर्दळ सुरु असते. हाकेच्या अंतरावर टिळकनगर पोलीस ठाणे असल्याने तशी भिती वाटत नाही, असे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.
पुण्यातील घटनेनंतर एसटी महामंडळ जागे झाले नसून डोंबिवली मधील बस स्टॅन्ड मधील सुरक्षा रामभरोसेच अशी स्थिती दिसते. कल्याण डेपो अंतर्गत डोंबिवली एमआयडीसी स्थानकातून दिवसभरातून सुमारे ७० बसेस धावतात. पुणे, नाशिक, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी आदि जिल्ह्यातून बसेस ये-जा करीत असतात. डोंबिवलीला डेपो नसल्याने डोंबिवलीकर प्रवाशांना इतर डेपोच्या बसेसवर अवलंबून राहावे लागत. डोंबिवली स्थानकात येणाऱ्या बसेस इतर डेपोतून येत असल्याने प्रवाशांना तासन्तास बस स्टॅण्ड मध्ये बसून एसटीची वाट पहावी लागते. महिलांसाठी जरी स्वच्छतागृह म्हणून जागा असली तरी त्याचा उपयोग करता येत नाही, अशी येथील भयानक परिस्थिती आहे.
त्यामुळे डोंबिवली एसटी स्टॅन्डची पोलिसांनी पाहणी करुन सीसीटिव्ही कॅमेरे लावण्यासाठी जागा पाहिली. दिवसरात ‘एसटी'च्या सुमारे ५०-५५ बसेस डोंबिवली स्टॅन्ड मधून ये-जा करतात. कोकणात फक्त रत्नागिरी, महाड, दापोली, अलिबाग, मुरुड या भागापुरतीच डोंबिवली स्टॅन्डतून सेवा मिळत असून तळकोकणसाठी येथून बसेस धावत नाही. पूर्वी डोंबिवली येथून तळकोकणासाठी बस होती; परंतु तो मार्ग आता बंद झाला आहे. कोकणातील राजापूर, देवगड, लांजा, कणकवली मार्गावर एसटी बस सोडण्याची मागणी डोंबिवलीकर करीत असतात. पावसाळा आणि उन्हापासून बचाव व्हावा म्हणून शेड बांधण्यात आली आहे, इतपतच सदर बसस्टॅन्ड असल्याचे प्रवासी सांगतात. कोकणात सण-उत्सावाला जाणाऱ्यांची संख्या खूप मोठी असते. त्या दरम्यान फक्त जादा बसेस सोडण्यावर महामंडळाचा भर असतो. मात्र, इतर वेळा या समस्येकडे दुर्लक्ष होत आहे.
डोंबिवली एसटी बस स्टॅन्डबाबत येथील वाहतूक नियंत्रण कर्मचारी मनाली मोरे यांना विचारले असता भिवंडी-विजापूर, कल्याण-वि्ीलवाडी येथून लातूर, रत्नागिरी, इस्लामपूर, सातारा अशा बाहेरगावी मुख्यतः जाणाऱ्या गाड्यांच्या वेळा रात्रीच्या आहेत. स्टॅन्ड परिसरात काही प्रमाणात लाईट व्यवस्था आहे, एक सुरक्षा कर्मचारी आहे; पण त्याचा कितपत उपयोग होईल ते सांगता येत नाही. मी सुध्दा घरातून पिण्यासाठी पाणी आणते. येथे पाण्याची सोय नाही. मी एकटीच महिला कर्मचारी काम करीत असून दरवाजा बंद करुन काम करते. माझ्या वेळेला सुरक्षा रक्षक नाही. यामुळे या बस स्टॅन्डमध्ये सर्वच काही रामभरोसे आहे, असे यावेळी प्रवाशांनी सांगितले.
वाहतूक अधीक्षक गोसावी यांना विचारले असता ते म्हणाले, पोलिसांनी या स्टॅन्डची पाहणी केली आहे. सीसीटिव्ही कॅमेरा लावण्याबाबत चर्चा झाली. या एसटी स्टॅन्डला रात्री १०.१५ वाजता शेवटची एसटी येते. रात्रपाळीवर एक सुरक्षा रक्षक आहे.