११ वर्षीय अमुल्या शाह हिचा दिल्ली स्विमेथॉनमध्ये पराक्रम
पनवेल : नवीन पनवेल येथील अमुल्या शाह हिने दिल्ली येथे दिनांक ५ ऑक्टोबर रोजी पार पडलेल्या दिल्ली इंटरनॅशनल स्विमेथॉन स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. राष्ट्रीय स्तरावरील या स्पर्धेत अमुल्याने १० किलोमीटर खुल्या गटात तब्बल ४ तास ३० मिनिटांत पोहून प्रथम क्रमांक पटकावला. तसेच, तिने ५०० मीटर स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळवत दुहेरी यश संपादन केले.
अमुल्या ही या स्पर्धेतील १० किलोमीटर खुल्या गटात उतरणारी आणि विजेतेपद मिळवणारी सर्वात लहान – केवळ ११ वर्षीय स्पर्धक ठरली आहे. तिच्या जिद्द, चिकाटी आणि उत्कृष्ट तंत्रज्ञानाचे सर्व स्पर्धक व आयोजकांनी मनापासून कौतुक केले. अमुल्या शाह ही एमएनआर इंटरनॅशनल स्कूल, पळस्पे येथे पाचवी इयत्तेत शिकत असून तिच्या या यशामागे कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमीच्या प्रशिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. तिच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.