खासदार डॉ. शिंदे यांनी घेतली केडीएमसी आयुक्तांची भेट
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेत २७ गावांतील कर्मचाऱ्यांचा महापालिकेत समाविष्ट करण्याबाबत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत आयुक्त अभिनव गोयल यांच्या दालनात महत्वाची बैठक पार पडली. यावेळी बैठकीत विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. सदर बैठकीस आमदार राजेश मोरे, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, ‘आगरी युथ फोरम'चे अध्यक्ष गुलाब वझे, आयुक्त अभिनव गोयल यांच्यासह महापालिका अधिकारी, स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते आणि अधिकारी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात २७ गावातील ग्रामपंचायतींमधील ४९९ कर्मचाऱ्यांचा ‘केडीएमसी'मध्ये समावेश करण्याचा निर्णय झाला होता. मात्र, या कर्मचाऱ्यांची ज्या पदावर नियुक्ती झाली होती त्याच पदावर त्यांना महापालिकेत रुजू करण्यात यावे, अशी मागणी सातत्याने करण्यात येत होती. या मागणीबाबत शासनाकडे प्रस्ताव देखील पाठवण्यात आला होता. याला शासनाने मंजूरी दिली असून २७ गावातील सर्व कर्मचारी ज्या पदावर रुजू झाले होते त्याच पदावर त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार महापालिकेतही कार्यरत राहतील, असा निर्णय शासनाकडून घेण्यात आला आहे. तर यातील १८० कर्मचाऱ्यांना नवरात्रौत्सव दरम्यान संबंधीत पत्र देखील देण्यात येईल, असे बैठकीत स्पष्ट करण्यात आले.
याचबरोबर यातील निरक्षर कर्मचाऱ्यांना मेडिकल आणि पोलीस व्हेरिफिकेशन देण्यात यावे. गावातील मयत आणि निवृत्त कर्मचाऱ्यांच्या वारसांना नोकरी आणि पेन्शन लागू करण्यात यावी. ज्या कर्मचाऱ्यांचे शिक्षण कमी असल्यास, त्यांना निकष पूर्ण करणासाठी ३ वर्षांची मुदत दिली जावी, याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली.
कचोरे टेकडी येथील संत सावळाराम महाराजांच्या स्मारक उभारणीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. स्मारक उभारणीसाठी निधीची उपलब्धता झाली असून लवकरच स्मारकाच्या उभारणीचे काम सुरू करण्याच्या सूचना यावेळी महापालिकेला दिल्या. दरम्यान, २७ गावातील नागरिकांना भरावा लागणाऱ्या पाणीकराबाबतही बैठकीत चर्चा करण्यात आली. याबाबत लवकरच आढावा बैठक आयोजित करुन सदरचा प्रश्न देखील मार्गी लावण्यात येईल, असे सांगण्यात आले.