म्हाडा निर्णयाच्या धर्तीवर सिडकोनेही घरांच्या किंमती कमी करण्याचा निर्णय घ्यावा
मालमत्ता कराचा भरणा करुन देयक शून्य करपावती सादर करा; अन्यथा कारवाई
उल्हासनगर : उल्हासनगर महापालिका मध्ये कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांपैकी ७० ते ७५ टक्के अधिकारी, कर्मचारी वर्ग स्थानिक रहिवाशी असून त्या अनुषंगाने या अधिकारी-कर्मचारी यांनी आपल्या मालमत्ता कराचा भरणा करणे आवश्यक आहे. ज्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अद्याप आपली मालमत्ता कराची भरणा केला नसेल, त्यांनी त्वरित मालमत्ता कराचा भरणा करुन देयक शून्य असल्याबाबतची करपावती प्रत सादर करण्याचे कार्यालयीन आदेश आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी दिले आहेत.
दरम्यान, कराचा भरणा केला नसल्याची बाब निदर्शनास आल्यास संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कायदेशीर प्रशासकीय कारवाई केली जाईल, असा इशाराही अधिकारी-कर्मचारी यांना देण्यात आला आहे.
उल्हासनगर महापालिका मालमत्ता कर विभागामार्फत चालू आर्थिक वर्ष २०२४-२५ करिता २४ फेब्रुवारी ते १८ मार्च २०२५ दरम्यान ‘अंतिम अभय योजना २०२४-२५' लागू करण्यात आलेली आहे.
अभय योजना अंतर्गत ६ मार्च २०२५ पर्यंत कराचा भरणा केल्यास १०० टक्के विलंब शास्ती माफ करण्यात येईल. दुसरीकडे महापालिका मध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांपैकी ७० ते ७५ टक्के अधिकारी-कर्मचारी वर्ग स्थानिक असून त्या अनुषंगाने कार्यरत असलेले सर्व स्थानिक अधिकारी आणि कर्मचारी वर्ग १,२,३ आणि ४ (डॉक्टर्स, अधीक्षक, वरिष्ठ लिपीक, लिपीक, शिक्षक, मनपा नर्स, मुकादम, माळी, मजूर, सफाई कामगार, तारतंत्री, वीजतंत्री, शिपाई, विद्युत मदतनीस, सुरक्षा रक्षक, अंगणवाडी सेविका, आशा वर्कस) यांनी आपल्या मालमत्ता कराचा भरणा करणे आवश्यक आहे, असे महापालिका प्रशासनातर्फे सूचित करण्यात आले आहे.
दरम्यान, ज्या अधिकारी-कर्मचारी यांनी अद्यापही आपल्या मालमत्ता कराचा भरणा केला नसेल त्यांनी ‘अभय योजना'च्या कालावधीमध्ये आपला मालमत्ता कराचा भरणा करुन कराचे देयक शून्य (Zero Balance) असल्याबाबतची करपावती प्रत सादर करावी. तसेच ‘अभय योजना'ला प्रतिसाद आणि महापालिका क्षेत्रातील नागरिक या नात्याने दायित्व सिध्द करणे आणि कर भरणा करणे आवश्यक असल्याचेही आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी सांगितले आहे.
एकंदरीतच आयुक्त मनीषा आव्हाळे यांच्या या आदेशाने महापालिकेत एकच खळबळ उडाली असून ज्यांनी मालमत्ता कराची भरणा केली नसेल, त्यांच्याविरुध्द प्रशासकीय कारवाई होईल का? असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.
मालमत्ता कर विभागामार्फत सदर बाब महापालिकेच्या उत्पन्नाशी निगडीत असल्याने, सर्व स्थानिक अधिकारी-कर्मचारी यांनी आपल्या मालमत्ता कराचा भरणा करणे आवश्यक आहे. त्यामुळे महापालिकेतील सर्व अधिकारी-कर्मचारी यांना कार्यालयीन आदेशाद्वारे कर भरणा करण्याबाबत अवगत करण्यात आले आहे. तसेच कराचा भरणा केला नसल्याची बाब निदशर्नास आल्यास संबंधित अधिकारी-कर्मचारी यांच्याविरुध्द नियमानुसार योग्य ती प्रशासकीय कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
-मनीषा आव्हाळे, आयुक्त-उल्हासनगर महापालिका.