प्रतिक्षा संपली! गव्हाण फाटा रेल्वे क्रॉसिंग पुल वाहतुकीसाठी खुला
निवडणूक विषयक कामकाजाचा नमुंमपा आयुक्तांकडून आढावा
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक १५ जानेवारी २०२६ रोजी होत असून १५ डिसेंबर पासून आचारसंहितेला सुरुवात झालेली आहे. आचारसंहितेच्या अनुषंगाने ‘राज्य निवडणूक आयोग'च्या आदेशानुसार ७२ तासांच्या कालावधीत अनधिकृत बॅनर्स, पोस्टर्स, होर्डींग विरोधात धडक मोहीम हाती घेण्यात आली आहे. याअंतर्गत ८ विभाग कार्यालय क्षेत्रात ७२ तासात १००१ अनधिकृत बॅनर्स, ५७८ कटआऊटस्-होर्डींग, २०४ पोस्टर्स, १२० झेंडे आणि ८४ भित्तीलेखन हटविण्यात आलेले आहे.
त्याचप्रमाणे महापालिकेच्या मालमत्तांसह शासकीय कार्यालये आणि इमारती तसेच सार्वजनिक आणि खाजगी जागांवरील राजकीय मजकुरही हटविण्यात आलेला आहे. याबाबतच्या कार्यवाहीचा आढावा महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी निवडण्की साठी नियुक्त केलेल्या नोडल अधिकारी यांच्या आढावा बैठकीत घेतला. यावेळी अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार आणि डॉ. राहुल गेठे, निवडणूक उपायुक्त भागवत डोईफोडे, शहर अभियंता शिरीष आरदवाड, मुख्य लेखा-वित्त अधिकारी सत्यवान उबाळे, अतिरिक्त शहर अभियंता अरविंद शिंदे आणि इतर विभाग प्रमुख नोडल अधिकारी उपस्थित होते.
निवडणुकीच्या अनुषंगाने आवश्यक कामे विहित वेळेत पार पाडण्यासाठी विषयांरुप नोडल अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली असून त्याचा बाबनिहाय आढावा आयुक्त शिंदे यांनी यावेळी घेतला. यापूर्वी राजकीय पक्ष प्रतिनिधींची बैठक घेऊन त्यांना निवडणूक विषयक कामकाजाची माहिती देण्यात आली होती. त्याचप्रमाणे आचारसंहिता कालावधीत पाळावयाच्या नियमांचीही जाणीव करुन देण्यात आली होती. त्या अनुषंगाने आचारसंहितेचे पालन करण्यात येत असल्याबद्दल तपासणी करण्यासाठी अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांच्या सनियंत्रणाखाली आचार संहिताकक्ष आणि त्या अनुषंगाने निवडणूक निर्णय अधिकारी निहाय गस्त पथके आणि चेकपोस्टची स्थायी पथके आणि व्हिडिओ सर्व्हिलन्स पथके स्थापन करण्यात आलेली असून त्याची कार्यवाही काटेकोरपणे करण्याच्या सूचना आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी दिल्या.
कायदा-सुव्यवस्थेबाबत पोलीस विभागाशी समन्वय राखून आवश्यक कार्यवाही करण्यासाठी अतिरिक्त आयुक्त डॉ. राहुल गेठे यांच्या सनियंत्रणाखाली कामकाज होणार असून निवडणूक कालावधीत आणि मतदान याकरिता सुरक्षा आराखडा तयार करण्यात येत आहे.
निवडणुकीकरिता उमेदवार आणि पक्ष यांच्यामार्फत देण्यात येणाऱ्या जाहिरात साहित्य तपासणी आणि प्रमाणपत्र देणे तसेच प्रसारमाध्यमांचे निरीक्षण करणे त्याचप्रमाणे प्रसारमाध्यमांना निवडणूक विषयक माहिती पुरविणे याकरिता मुख्य लेखा-वित्त अधिकारी सत्यवान उबाळे मिडीया सेल आणि एमसीएमसी समितीचे नोडल अधिकारी असून सदर कक्षाचे काम सुरु करण्यात आलेले आहे.
यावेळा ४ सदस्यीय प्रभाग रचना असल्याने २८ प्रभागांपैकी २७ प्रभागांमध्ये एका मतदारास ४ सदस्यांना मतदान करावयाचे आहे आणि एका २८ क्रमांकाच्या प्रभागामध्ये ३ सदस्यांना मतदान करावयाचे आहे. या अनुषंगाने मतदान कार्यपध्दतीबाबत व्यापक जनजागृती करण्याकरिता विविध प्रसार माध्यमांचा उपयोग केला जाणार असून मतदार जनजागृती कामाकरिता घनकचरा व्यवस्थापन उपायुक्त डॉ. अजय गडदे नोडल अधिकारी आहेत.
निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात सदर कामे अत्यंत महत्वाची असून त्यानुसार तत्पर कार्यवाही करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. त्यासोबतच मतदान आणि मतमोजणी यासाठी आवश्यक कार्यवाही पूर्व नियोजन करुन करण्यास तत्परतेने सुरुवात करावी. दैनंदिन कार्यवाहीचा अहवाल नियमितपणे सादर करावा, असे स्पष्ट निर्देश आयुवतांनी दिले.
दरम्यान, निवडणूक कामासाठी मतदान आणि मतमोजणी करिता ६२७५ कर्मचाऱ्यांची आवश्यकता असून ते उपलब्ध् करुन घेण्यासाठी गतीमान कार्यवाही करण्याच्या सूचना मनुष्यबळ व्यवस्थापनाचे नोडल अधिकारी असणाऱ्या प्रशासन विभागाचे उपायुक्त किसनराव पलांडे यांना देण्यात आल्या. सर्व मतदान केंद्रे आणि निवडणूक निर्णय अधिकारी यांची कार्यालये जिओ टॅगिंग करुन घ्यावीत, जेणेकरुन त्यांचे स्थळ सर्वांनाच लगेच समजेल, असेही आयुक्तांमार्फत सूचित करण्यात आले.
नवी मुंबई महापालिकेची निवडणूक निर्भय, मुक्त आणि पारदर्शक वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीने निवडणूक विषयक विविध कामांकरिता नियुक्त नोडल अधिकारी यांच्यामार्फत आवश्यक कार्यवाही करण्यात येत आहे. संभाव्य उमेदवारांना नामनिर्देशनपत्र दाखल करताना मालमत्ता कर, पाणीपट्टी आणि विविध विभागांची ना-हरकत प्रमाणपत्रे आवश्यक असून त्या दृष्टीने सर्वांच्या सुविधेकरिता प्रत्येक विभाग कार्यालयात एक खिडकी योजनेद्वारे एकाच ठिकाणी सर्व आवश्यक प्रमाणपत्रे उपलब्ध होतील याबाबत तत्पर कार्यवाही करावी. त्याचप्रमाणे सभांना देण्यात येणाऱ्या मैदानांची परवानगी विषयक कार्यवाहीदेखील सर्वांना समान न्याय या पध्दतीने करावी.
- डॉ. कैलास शिंदे, आयुवत - नवी मुंबई महापालिका.