तिकीट वाटपात समर्थकांना डावलण्यात आल्याने आ.मंदाताई म्हात्रे नाराज

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपमधील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले असून, आमदार मंदाताई म्हात्रे यांनी वनमंत्री गणेश नाईक यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तिकीट तसेच ‘एबी’ फॉर्म वाटपात उघडपणे पक्षपात करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

“पक्षासाठी अनेक वर्षे निष्ठेने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना डावलण्यात आले असून, काही ठराविक व्यक्तींनाच प्राधान्य देण्यात आले आहे. सदर प्रकार अत्यंत दुर्दैवी असल्याचे मंदाताई म्हात्रे यांनी   मीडिया समोर सांगितले. 

संजीव नाईक आणि संदीप नाईक हे भाजपमधील नवखे आहेत. दीर्घकाळ पक्षासाठी काम करणाऱ्या जुन्या व निष्ठावान कार्यकर्त्यांना संधी न देता नव्याने आलेल्यांना तिकीट व ‘एबी’ फॉर्म देणे हे अन्यायकारक असल्याचे सांगत नाईक परिवाराने आता १११ प्रभागात आपले उमेदवार निवडून आणून दाखवावेत, असे उघड आव्हान देखील मंदाताई म्हात्रे यांनी यावेळी दिले.

दरम्यान, आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पक्षसाठी काम केलेल्या कार्यकर्त्यांसाठी १२-१३ तिकिटांची मागणी केली होती. पण, पक्षाने त्याकडे दुर्लक्ष केल्याने कार्यकर्ते नाराज आहेत. मी या कार्यकर्त्याच्या मागे कायम उभी राहणार असून मुलाला दिलेले तिकीट नाकारणार आहे, असे आ. मंदाताई म्हात्रे यांनी यावेळी स्पष्ट केले.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

केडीएमसी निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी इच्छुकांची उडाली झुंबड